मुंबई :
मागील अनेक महिन्यांपासून सीटी स्कॅन मशीन बंद असल्याने केईएम, शीव व नायर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना खासगी केंद्रांवर तपासणी करावी लागत होती. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत होता. रुग्णांची ही अडचण लक्षात घेऊन मुंबई महापालिकेनेही सीटी स्कॅन मशीन खरेदीची प्रक्रिया राबविली होती. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्षात सीटी स्कॅन मशीन येण्यास वर्षापेक्षा जास्त कालावधी लागला. अखेर केईएम, शीव व नायर रुग्णालयामध्ये सीटी स्कॅन मशीन सुरू झाल्याने गरीब रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर आणि शीव या महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये दररोज चार ते पाच हजार रुग्ण उपचारासाठी बाह्य रुग्ण विभागात तर अनेक रुग्ण अपघात विभागात येत असतात. यातील साधारणपणे १०० ते १२० रुग्णांपेक्षा अधिक रुग्णांना सीटी स्कॅन करण्याची गरज भासत असते. मात्र या रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन वारंवार नादुरुस्त असल्याने किंवा बंदच असल्याने सीटी स्कॅनसाठी रुग्णांना वाट पाहावी लागत असे. केईएम रुग्णालयामध्ये सीटी स्कॅनसाठी रुग्णांना दोन महिने थांबावे लागत असे. तर नायर रुग्णालयामध्ये सीटी स्कॅन मशीन तब्बल दोन महिने बंद होती. परिणामी रुग्णांना खासगी केंद्रावर सीटी स्कॅन करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन केईएम, नायर आणि शीव रुग्णालयामध्ये नवीन व अद्ययावत सीटी स्कॅन मशीन आणण्याबाबत मुंबई महानगरपालिकेने खरेदी प्रक्रिया सुरू केली होती. ही खरेदी प्रक्रिया सुरू होऊन प्रत्यक्षात नवीन सीटी स्कॅन मशीन येण्यासाठी एका वर्षापेक्षा अधिक कालावधी लागला. मात्र मार्चमध्ये या तिन्ही रुग्णालयांमध्ये नवीन व अद्ययावत सीटी स्कॅन यंत्रणा सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे सीटी स्कॅन कराव्या लागणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळत आहे.
देशातील सर्वाधिक अद्ययावत सीटी स्कॅन मशीन
केईएम, नायर व शीव रुग्णालयामध्ये बसविण्यात येणारी या तिन्ही मशीन ही देशातील आतापर्यंतची सर्वाधिक अद्ययावत आहेत. जपानच्या कॅनन या कंपनीच्या या मशीन असून, कॅनन प्रायमा ॲक्विलियम या प्रकारातील या मशीन आहेत. आतापर्यंतच्या यंत्रांमध्ये १२० स्लाईस असायच्या मात्र नव्या यंत्रांमध्ये १६० स्लाईस असणार आहे. यामुळे हृदय, यकृत, स्वादूपिंड, मेंदू यातील २ मिमीपर्यंतचा सुक्ष्म ट्युमर दिसणार आहे. तसेच शरीरातील रक्त व पू यातील फरक लगेच दिसून येणार आहे. छोट्यातील छोटी बाब अचूक हेरता येणार असल्याने रुग्णांवर उपचार करणे अधिक सोपे होणार आहे.
केईएममध्ये अत्याधुनिक डॉपलर अल्ट्रासाऊंड मशीन
केईएम रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागातील अल्ट्रासाऊंड मशीन बंद होते. त्यामुळे या विभागातील महिलांना क्ष किरणशास्त्र व किरणोत्सर्ग विभागात सोनाग्राफीसाठी जावे लागत होते. मात्र आता केईएम रुग्णालयात अत्याधुनिक व्ही ६ कलर डॉपलर अल्ट्रासाऊंड मशीन व्यावसायिक समाजिक जबाबदारीतून आणण्यात आले आहे. या यंत्रामुळे खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर गर्भवती महिलांची सोनोग्राफी होणार आहे. केईएम रुग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात दररोज २५० ते ३०० महिला उपचारासाठी येतात. पण आता या विभागात स्वतंत्र मशीन मिळाल्याने महिलांची योग्य वेळेत सोनोग्राफी होण्यास मदत होणार आहे. या मशीनचा उपयोग कृत्रिम गर्भधारणा विभाग सुरू झाल्यानंतर होणार आहे.