मुंबई :
संसर्ग रोखण्याची शक्ती ही लसीकरणामध्ये आहे. लसीकरण हा बालकांच्या संगोपनातील महत्त्वाचा घटक आहे. पोलिओ, क्षयरोग, गोवर, कांजण्या अशा विविध आजारांपासून लहान मुलांचे संरक्षण व्हावे आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढावी, यादृष्टीने लसीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारतात २६ रोगांसाठी लस आहेत परंतु सामान्यत: फक्त १० ते १२ रोगांवर लसीकरण केले जाते. लसीकरण टाळल्यामुळे भविष्यात अनेक आजारांची लागण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण टाळण्यात येऊ नये, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
लसीकरण करण्याचे उद्दिष्ट संसर्गजन्य रोगांना रोखणे आहे. करोनातील टाळेबंदीमुळे नियमित लसीकरणामध्ये घट झाल्याने जवळपास ६७ दशलक्ष मुले लसींपासून वंचित राहिल्याचे युनिसेफच्या ‘द स्टेट ऑफ द वर्ल्ड्स चिल्ड्रन २०२३’च्या अहवालात स्पष्ट झाले आहे. लहान मुलांबरोबरच पौगंडावस्था, गर्भवती महिला आणि ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्धांसह सर्वच वयोगटातील लोकांसाठी लसीकरण महत्त्वपूर्ण आहे. इन्फ्लूएंझा, न्यूमोनिया, हिपॅटायटीस आणि डांग्या खोकला याविरुद्ध लढण्यासाठी लस महत्त्वपूर्ण आहे. मात्र देशात लसीकरणाबाबत जागरूकता नसल्यामुळे लहान मुले आणि प्रौढांवर लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. गालगुंड आणि एमएमआर, न्यूमोनियाची लस न घेतल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामाेरे जावे लागत असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अंकित गुप्ता यांनी सांगितले.
सरकार मोफत लस देत असूनही, अनेक लोक अजूनही लसीकरण करत नाहीत आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. करोनापूर्वी किंवा त्यादरम्यान जन्माला आलेल्या मुलांचे लसीकरण न झाल्याने ती मुले आता विविध आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ बादशाह खान यांनी दिली.
या लसी आहेत महत्त्वपूर्ण
एमएमआर लस गोवर, गालगुंड आणि रुबेलाविरुद्ध, व्हेरिसेला लस कांजण्यासाठी, आयपीव्ही लस पोलिओ आणि न्यूमोकोकल लस न्यूमोनियासाठी तसेच गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लस महत्त्वपूर्ण आहे. इन्फ्लूएंझा लस सर्व वयोगटातील लोकांबरोबरच विशेषतः मधुमेह, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
कोणासाठी आहेत लसी
गर्भवती महिलांसाठी टीटी-१, टीटी-२, टीटी-बूस्टर, तर शिशू व बालकांसाठी वाढत्या वयानुसार लसी आहेत. ५० वर्षावरील व्यक्तींसाठी न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस, नागीणचा प्रतिबंध करणारी लस, इन्फ्लूएंझा लस आवश्यक आहे.