पुणे :
लोकसभा निवडणुकीची ही लढाई महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नसून जगभरात भारताचा सन्मान वाढवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध देशाची बदनामी करत फिरणारे राहुल गांधी यांच्यातच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. पुणेकर खूप हुशार आहेत. येत्या निवडणुकीत ते विरोधकांची हवा काढतील अशी टीका त्यांनी केली.
पुण्यातील रेसकोर्स मैदानात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या विराट प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे मोदी आणि विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदीच आहे. लोकांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रेकॉर्डब्रेक सभा होत आहेत. मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी या देशाची १४० कोटी जनता आतूर आहे. हीच गॅरंटी समोर बसलेल्या अथांग जनसागराने दिली आहे.
‘प्राण जाए पर वचन ना जाए’ ही मोदीजींच्या कामाची पद्धत आहे. ते म्हणाले होते कलम ३७० हटवणार आणि त्यांनी कलम ३७० हटवले व आपल्या काश्मिरला भारताशी जोडले. राम मंदिर आपल्या सगळ्यांना स्वप्नवत वाटत होते परंतु मोदीजींनी अयोध्येमध्ये भव्य राम मंदिरांची उभारणी केली आणि करोडो राम भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले, असे मुख्यमंत्री म्हणाले. मोदीजींच्या नसा नसांमध्ये रक्ताच्या प्रत्येक थेंबात देशभक्ती भरलेली आहे. जेव्हा मोदीजी द्वारका दर्शनासाठी पाण्याखाली गेले तेव्हाही त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे देशहिताची प्रार्थना केली. हाच मुख्य फरक देश बुडवणारे विरोधक आणि देश हिताची प्रार्थना करणारे मोदीजी यांच्यात आहे, असे त्यांनी सांगितले.
भारताला महासत्ता करण्याचे वचन देखील मोदीजी पूर्ण करून दाखवतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ या चिन्हांना मतदान म्हणजे मोदीजींना मत म्हणजेच देशाच्या विकासाला मत अशी जनमाणसांची भावना आहे. मागील १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम करताना एकही भ्रष्टाचाराचा डाग लावू दिला नाही. पण हा केवळ ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. देशात फक्त मोदीजींची गॅरंटी चालते बाकी सगळ्यांच्या गॅरंटी फेल झाल्या आहेत.
पुणेकर विरोधकांची हवा काढतील
पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर येथील महायुतीच्या चारही उमेदवारांना आपल्याला विजयी करायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी मतदारांना केले. ते पुढे म्हणाले की, पुणेकर खूप हुशार आहेत. एखाद्याच्या घरासमोरची गाडी काढायची असेल तर ते त्या गाडीची हवा काढतात. निवडणुकीत देखील विरोधी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी पुणेकर त्याची हवा काढतील, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.