बीड :
देशातील इंडिया आघाडी पाकिस्तान बरोबर आहे. विरोधक पाकिस्तानची बोली बोलू लागले आहेत. 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाबच्या गोळीने झाला नाही, असे काँग्रेसचे वडेट्टीवार बरळले आहेत. दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस आणि एनएसजी कमांडोंचा अपमान करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत धडा शिकवा, अशी साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मतदारांना घातली.
बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. देशभरात प्रचाराचे वातावरण तापले आहे. राज्यात देखील तापमान चाळीसच्या पुढे गेले आहे. 4 जूनला तारखेला महाराष्ट्राचा पारा 45 पार होईल. तर देशातला पारा 400 पार होऊन महायुतीच्या या तळपत्या विजयामध्ये विरोधकांची लंका खाक झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
‘दिल्ली गाजवणार मुंडे साहेबांची लेक, कुठून आली तुतारी चल उचलून फेक’ असे बीडमधील जनता बोलत आहेत. त्यामुळे बीडमध्ये तुतारीची पिपाणी होईल, असा टोला मुख्यमंत्र्यांनी हाणला. देशातील इंडिया आघाडी पाकिस्तान बरोबर आहे. त्यांचे नेते पाकिस्तानची भाषा बोलू लागले आहेत. फारूक अब्दुल्ला ही भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गात आहेत. देशात राहून पाकिस्तानची बोली बोलणाऱ्या देशद्रोह्यांना देशद्रोहाच्या कलमामध्ये जेलमध्ये टाकले पाहिजे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आमच्याकडे सर्वात मोठा अणुबॉम्ब इथे बसला असून ते सरळ पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक करतात. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करायचा असेल तर खुशाल करावा, पण त्यासाठी घाणीमध्ये चिखलामध्ये लोळू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ‘बेडकाला सोन्याच्या विटेवर जरी बसवले तरी तो चिखलातच उडी मारतो.’ या म्हणीप्रमाणे विरोधकांची अवस्था बेडकासारखी झालेली आहे. काँग्रेसवाल्यांनी थोडी जनाची नाहीतर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. मोदींना हरवण्याची भाषा हे चिरकूट लोक करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशी विरोधकांची अवस्था आहे. त्यामुळे पहिले आपले घर सांभाळा, असा सल्ला देत उघड्या शेजारी नागडा गेला, अशी विरोधकांची अवस्था आहे. विरोधकांनी कितीही आदळआपट केली तरी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.