मुंबई :
एमएचटी सीईटीच्या परीक्षेतील प्रश्न व उत्तरतालिकाबाबत विद्यार्थ्यांकडून दिलेल्या मुदतीनंतरही आक्षेप नोंदवण्यात येत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत एमएचटी सीईटीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश कक्षाचे (सीईटी कक्ष) नवनिर्वाचित आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली. एमएचटी सीईटीची परीक्षा २२ एप्रिल ते १६ मे दरम्यान झाल्यानंतर सीईटी कक्षाकडून निकालाबाबत वेगवेगळ्या तारखा जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत संभ्रम निर्माण झाला होता.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी शिक्षण पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पीसीबी गटाची परीक्षा २२ ते ३० एप्रिल २०२४ दरम्यान तर पीसीएम गटाची परीक्षा २ ते १६ मे २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. या दोन्ही परीक्षांमधील प्रश्न व उत्तर तालिका विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्यासाठी उपलब्ध केले होते. यावर विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठी मुदत दिली होती. यानंतर सीईटी कक्षाकडून प्रथम जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यानंतर निकालाची संभाव्य तारीख १० जून जाहीर केली. मात्र त्यानंतर निकाल हा १९ जून किंवा त्यापूर्वी जाहीर करणार असल्याचे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आक्षेप नोंदवण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतरही अनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांकडून ईमेलद्वारे आणि सीईटी कक्षाच्या कार्यालयात येऊन मुदत वाढवण्याची विनंती करण्यात येत होती. त्यामुळे आक्षेपांसदर्भातील निकाल जाहीर केल्यानंतरही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी तक्रार केलेल्या विद्यार्थ्यांच्या आक्षेपांची नोंद सीईटी कक्षाकडून घेण्यात आली. आक्षेपातील तथ्य जाणून घेण्यासाठी तातडीने तज्ज्ञांची बैठक घेत पडताळणी केली असता सात आक्षेपांमध्ये तथ्य आढळले. त्यामुळे चुकीच्या प्रश्नांची संख्या ४७ वरून ५४ इतकी झाली. या प्रश्नांचा विचार करून निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीस सरदेसाई यांनी दिली.
एमएचटी सीईटीचा निकाल दोन दिवसांत
एमएचटी सीईटीचा निकाल १९ जून किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येईल, असे सीईटी कक्षाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्या आले आहे. मात्र प्रवेश प्रक्रियेला लवकर सुरूवात व्हावी यासाठी हा निकाल येत्या तीन ते चार दिवसांत म्हणजे १९ जूनपूर्वीच जाहीर करण्यात येणार असल्याचे कळते.
६ लाख ७५ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
सीईटी कक्षाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेला ७ लाख २५ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ७५ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी सीईटी दिली होती. या विद्यार्थ्यांमध्ये ३ लाख ७९ हजार ८६८ विद्यार्थ्यांनी पीसीएम या गटातून तर पीसीबी या गटातून ३ लाख १४ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.