आरोग्य

औषध वितरकांची ६१ कोटी रुपयांची देयके वर्षांपासून प्रलंबित

देयके मंजूर न झाल्यास ७ जुलैपासून आंदोलनाचा इशारा

मुंबई :

राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभाग व आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांना हाफकिनमधील खरेदी कक्षामार्फत गतवर्षापर्यंत औषधे व उपकरणांचा पुरवठा करण्यात येत होता. खरेदी कक्षाने वितरकांकडून खरेदी केलेल्या औषधांची वर्षभरापासून जवळपास ६१ कोटी ४० लाख रुपयांची देयके प्रलंबित ठेवली आहेत. त्यामुळे औषध वितरकांना व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे तातडीने देयके मंजूर न झाल्यास ७ जुलैपाासून खरेदी कक्षाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा औषध वितरकांच्या संघटनेने दिला आहे.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी मागील वर्षाच्या ऑगस्टपर्यंत औषध व उपकरणे खरेदी करण्याची जबाबदारी हाफकिनमध्ये सुरू केलेल्या खरेदी कक्षाकडे होती. मात्र या खरेदी कक्षामध्ये झालेल्या प्रचंड गैरव्यवहारामुळे हा विभाग बंद करत औषध खरेदीसाठी नवीन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. मात्र खरेदी कक्षाने वितरकांकडून खरेदी केलेली औषधे व उपकरणांची देयके मागील वर्षभरापासून प्रलंबित आहेत. सर्व वितरकांच्या देयकांची रक्कम ही ६१ कोटी ४० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. ही प्रलंबित देयके मंजूर करण्यासाठी वितरकांकडून वारंवार पाठपुरावा व वैयक्तिक विनंती करूनही देयके मंजूर करण्यात येत नाहीत. या कारणांमुळे अनेक वितरक हे दिवाळीखोरीच्या मार्गावर असून, त्यांचे व्यवसाय बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही देयके तातडीने मंजूर करण्यात यावीत, अन्यथा ७ जुलैपासून खरेदी कक्षाच्या कार्यालयासमोर देयके मंजूर होईपर्यंत उपोषण करण्यात येईल, असा इशारा औषध वितरकांची संघटना असलेल्या ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *