मुंबई :
जे.जे. रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून बेमुदत आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामुळे बाह्यरुग्ण सेवेवर फारसा परिणाम झाला नाही. मात्र आंतररुग्ण विभाग व शस्त्रक्रियागृहातील सेवेवर काहीअंशी परिणाम झाला. दरम्यान, बदली कामगार संपावर न गेल्याने रुग्णसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली नाही.
‘बोल मेरे भैय्या… हल्लाबोल’, ‘पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’, ‘हम सब एक है’, ‘कोण म्हणते देणार नाही… घेतल्याशिवाय राहणार नाही”, ‘कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी सकाळपासून जे.जे. रुग्णालय परिसर दणाणून सोडला. बदली कामगार वगळता सर्व कर्मचारी आंदाेलनात सहभागी झाल्याने बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, प्रयोगशाळा, शस्त्रक्रियागृह आदी विभागांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी होती. बाह्यरुग्ण विभागामध्ये आंदोलनाचा फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र आंतररुग्ण विभागातील रुग्ण सेवेवर काहीअंशी परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. जे. जे.रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये बदली कामगार सहभागी झाले नव्हते. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या विभागातील सेवा सुरू होत्या. त्याचप्रमाणे शिकाऊ परिचारिका, आंतरवासिता करणारे विद्यार्थी यांच्या माध्यमातून प्रशासनाने रुग्णसेवा सुरळीत ठेवली. तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रुग्णांच्या जेवणाची सोय केल्याने रुग्णांचे फारसे हाल झाले नाही. दाखल रुग्णांना विविध तपासण्यासाठी संबंधित विभागात घेऊन जाण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्याने नातेवाईकांनाच रुग्णांना चाचण्यांसाठी घेऊन जावे लागले. त्याचप्रमाणे लघुशस्त्रक्रियागृहामध्ये कर्मचारी उपलब्ध नसल्याने पुढील आठवड्यात बोलवण्यात आल्याचे काही रुग्णांकडून सांगण्यात आले.
जे.जे. रुग्णालयामध्ये १३५२ मंजूर खाटा असून, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची १२०० पदे मंजूर आहेत. मात्र यापैकी ३५० पदे मागील १० वर्षांपासून रिक्त असून, ती भरण्यातच आलेली नाहीत. त्यामुळे रिक्त पदे सरळसेवेने तातडीने भरावी, बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, बदली कामगारांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करावी.
– कृष्णा रेणोसे, अध्यक्ष ,जे. जे. रुग्णालय कर्मचारी संघटना
पहिल्या दिवशी रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र आंदोलनाची पुढील दिशा लक्षात घेऊन अन्य सरकारी कार्यालातील किंवा बाह्यस्रोत्राद्वारे तात्पुरत्या स्वरुपात कर्मचाऱ्यांची नियुक्त केली जाईल. रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. कर्मचाऱ्यांची निवेदने वेळोवेळी सरकारकडे पाठवली आहेत.
– डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय