मुंबई :
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) एम.ई, एम. टेक आणि एम. आर्क या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. मंगळवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी १७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
एम.ई आणि एम.टेक या अभ्यासक्रमांसाठी मे महिन्यात सीईटी झाली होती. तर एम.आर्कसाठी परीक्षेसाठी ९३९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, यातील ८४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी १७ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी १० ते १८ जुलैदरम्यान होणार आहे. तसेच एम.ई अभ्यासक्रमाची अंतरिम गुणवत्ता यादी २० जुलै तर एम. टेक आणि एम. आर्क २३ जुलै रोजी जाहीर होणार आहे. यावर २३ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना हरकती नोंदवता येणार आहे. तर, अंतिम यादी २५ जुलै रोजी जाहीर होणार आहे.