मुंबई :
बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम आणि एमबीए एकात्मिक आणि एमसीए इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांसाठी ४ ऑगस्ट रोजी अतिरिक्त सीईटी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून ४९ हजार २१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा प्रथमच सीईटी घेण्यात आली. प्रथमच सीईटी घेतल्याने अनेक विद्यार्थ्यांना याबाबत कल्पना नसल्याने त्यांना परीक्षा देणे शक्य झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला व्यक्तीश: भेट देऊन, मेलद्वारे, दूरध्वनीद्वारे तसेच अर्जाद्वारे अतिरिक्त परीक्षा घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या अभ्यासक्रमाची अतिरिक्त सीईटी घेण्यास मंजूरी दिली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अतिरिक्त सीईटीसाठी २९ जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. या नाेंदणीला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ४९ हजार २२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये २९ हजार ७९१ मुले तर १९ हजार ४३० मुलींनी आणि ४ तृतीयपंथीयांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची आता ४ ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी ई-मेल आणि एसएमएसद्वारे ‘ॲडमिट कार्ड’ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात येतील, असे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून २९ मे रोजी बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाची सीईटी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ५६ हजार २४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामुळे जवळपास ६० हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.