मुंबई :
पावसाळा सुरू झाल्यावर वाढणाऱ्या हिवताप व डेंग्यूच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी दत्तक कुटुंब योजनेंतर्गत मुंबई महानगरपालिकेने लढा सुरू केला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेणारे डॉक्टर या योजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या प्रत्येक कुटुंबात जाऊन साथीच्या आजाराला प्रतिबंध कसा करायचा, त्यावर उपाययोजना काय आहेत, याबाबत जनजागृती करत आहेत. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
वस्ती, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना सहज आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, रुग्णालयात आल्यावर वैद्यकीय उपचारात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दत्तक कुटुंब योजना राबवण्यात येते. या योजनेंतर्गत वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमाला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निश्चित केलेल्या वस्ती व झोपडपट्टीमधील प्रत्येकी तीन घरे दत्तक घ्यायची असतात. हा विद्यार्थी आरोग्याच्या दृष्टीकोनातून संबंधित तीन कुटुंबांला वारंवार भेट देत असतो. त्यामुळे तो त्यांच्या सातत्याने संपर्कात असतो. या विद्यार्थ्यांना त्या कुटुंबाशी थेट संपर्क साधणे सोपे होते. ही बाब लक्षात घेत केईएम, नायर, कूपर आणि शीव रुग्णालयाच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाने या दत्तक कुटुंबामध्ये संबंधित विद्यार्थ्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांकडून सोप्या व सरळ भाषेत सांगण्यात येत असलेल्या आरोग्य विषयक माहितीमुळे त्या कुटुंबाना हिवताप, डेेंग्यू याची तीव्रता लक्षात येत आहे. त्यामुळे दत्तक कुटुंब योजनेतंर्गत करण्यात येत असलल्या जनजागृतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची महिती मुंबई महनगगरपालिकेतील एका आरोग्य अधिकाऱ्यांनी संगितले
वस्तीपातळीवर सर्वेक्षण, कीटकनियंत्रण करण्याबरोबरच झोपडपट्टी, गृहनिर्माण संस्था व चाळींमध्ये जनजागृती करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयातील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागामार्फत सध्या प्रयत्न सुरू आहेत. दत्तक कुटुंब योजनेला त्याला अधिक प्रेरणा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.