शहर

पंढरपूर येथे राज्यातील पहिले यात्रा बसस्थानक

यात्री निवासाचे लोकार्पण आषाढी एकादशीला होणार

मुंबई :

पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या जागेवर राज्यातील पहिले ३४ फलाटाचे भव्य असे चंद्रभागा यात्रा बसस्थानक व त्याला जोडूनच एक हजार यात्रेकरू एकावेळी राहतील, अशा यात्री निवासाचे लोकार्पण आषाढी एकादशी दिवशी (१७ जुलै) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या यात्री निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पंढरपूर येथे एसटी महामंडळाचे अद्यावत बस स्थानक आहे. तेथून शेकडो बसेस राज्यभरात प्रवाशांच्या सेवेत आहेत. तथापि,आषाढी आणि कार्तिकी सारख्या मोठ्या यात्रेसाठी ते बसस्थानक अपुरे पडत होते. म्हणून एसटी महामंडळामार्फत ११ हेक्टर जागेवर ३४ फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. याबरोबरच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक- यात्रेकरूंची निवासाची अल्प दरात सोय व्हावी या दृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे.

या यात्री निवासामध्ये एकाच वेळी सुमारे १ हजार यात्रेकरू राहू शकतात. येथे एसटी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी २ सुसज्ज उपहारगृहे देखील बांधण्यात आली आहेत. हा राज्यातील एसटी महामंडळाचा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी ३३ कोटी रुपये खर्च आला आहे. या भव्य प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

या बस स्थानकावरून आषाढी आणि कार्तिक यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी राज्यभरातील सर्व ठिकाणी एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. येथे एसटीच्या सुमारे ५०० कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. याबरोबरच सुमारे १ हजार यात्रेकरू देखील राहतील, असे भव्य यात्री निवास बांधण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *