शहापूर :
शहापूर येथील सुमित शेट्टी व केतकी शेट्टी या दाम्पत्याने बनविलेल्या आकर्षक गणेश मूर्तींची ख्याती सातासमुद्रापार गेल्याने त्यांनी बनविलेल्या गणेश मूर्तींना परदेशातून दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. यावर्षी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी परदेशात आतापर्यंत १ हजार २५० गणेशमूर्ती पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये मलेशिया, दक्षिण आफ्रिका, थायलंड, लंडन, आस्ट्रेलिया व दुबई या ठिकाणी मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत. चार वर्षापूर्वी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नोकरी गेलेल्या सुमितने आपल्या पत्नी व मित्रांसोबत मूर्ती बनवून विकण्याच्या व्यवसायाला सुरूवात केली. त्यांच्या व्यवसायाला ‘विघ्नहर्ता गणपती बाप्पा’ पावला असून यावर्षी भारतासह परदेशातून माेठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. शहापूरबरोबरच त्यांनी चेंबूर येथेही गणपती मूर्ती बनवण्याचा कारखाना सुरू केला असून त्यात १९ बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचे मूर्तिकार सुमित शेट्टी यांनी सांगितले.
शहापुर येथील सुमीत शेट्टी व पत्नी केतकी शेट्टी यांनी गणपती कारखान्यात मूर्ती बनवायच्या अनुभवाचा फायदा घेत गणेश मूर्ती बनवून प्रदर्शन व विक्री व्यवसाय सुरु केला होता. यासाठी त्यानी पेण येथून गणेशमूर्तीसाठी लागणारा कच्चा माल आणून विविध प्रकारच्या मूर्ती बनवायचे काम सुरु करून समाज माध्यमांवर मूर्तींची जाहिरात केली व त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. सुमित व शुभमने 6 इंच ते 4 फूटापर्यंत मूर्ती बनवून विक्रीसाठी ठेवल्या. त्याची किंमत १२०० रुपयापासून २१ हजार रुपयापर्यंत आहेत. समाज माध्यमावरील जहिरातीमुळे गुजरात, औरंगाबाद, जालना, ठाणे व कल्याण येथून या गणेश मूर्तींना मागणी वाढली, त्यातच आता परदेशातूनही मागणी येत आहे. परिसरातील गणेश भक्ताचीही त्यांच्याकडे गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. सध्या त्यांच्याकडे १९ कर्मचारी काम करीत असून, बाहेरगावी ने-आण सोयीस्कर व्हावी यासाठी चेंबूर येथे भाड्याने कारखाना सुरू केला आहे. कच्या मालाची किंमत २० टक्क्यांनी वाढली आहे. त्यांनी बनविलेल्या मूर्ती इंदोर, पालघर, पुणे, ठाणे, डोंबिवली व कल्याण इत्यादी येथील विक्रीसाठी नेल्या जात असून ७५०० मूर्तींची आतापर्यंत घाऊक भावात विक्री केली आहे.
कोरोनामुळे आमची नोकरी गेल्याने आम्ही शहापुरात ६० गणपती मूर्ती बनवण्यापासून सुरू केलेला कारखाना आज ९ ते १० हजार गणपती मूर्ती बनवण्यापर्यंत पोहचला आहे. गणेश मूर्तीच्या व्यवसायामुळे आम्हाला रोजगार उपलब्ध झाला. आम्ही बनविलेल्या मूर्तींना परदेशातून मागणी येत असल्याने आम्हाला गणपती बाप्पा पावला आहे. आमच्या दोघांची मेहनत व मित्रमंडळींचे सहकार्य यामुळेच हे शक्य झाले आहे.
– केतकी व सुमित शेट्टी, मूर्तिकार