चेंबूर :
चेंबूर जिमखान्याच्यावतीने आयोजित केलेल्या व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत तिसऱ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला एकेरीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने बाजी मारली. अंतिम सामन्यात तिने प्रतिस्पर्धी मुंबईच्या रिंकी कुमारीला २५-२३, २५-५ असे सहज नमवून विजेतेपद पटकाविले. तर पुरुषांच्या अंतिम सामन्यात अनुभवाच्या जोरावर मुंबईच्या महम्मद घुफ्रानने मुंबईच्या विकास धारियावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीमध्ये पहिला सेट ११-२५ असे हरल्यानंतर पुढील दोन सेट २५-११ व २५-१५ असे जिंकून आपल्या विजयावर शिक्कमोर्तब केले.
अंतिम सामन्यापूर्वी उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे मुंबई क्लस्टर १ चे प्रमुख गुंजन सिंग यांच्या हस्ते नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली. पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी विकास धारियाने मुंबईच्या अमोल सावर्डेकरवर २५-५, १८-११ अशी सहज मात केली होती. तर घुफ्रानने मुंबईच्या माजी विश्व विजेत्या प्रशांत मोरेला कडव्या लढतीनंतर १८-१२, ५-२५ व २१-१९ असे नमविले होते. महिलांमध्ये विजेत्या आकांक्षाने उपांत्य लढतीत मुंबईच्या नीलम घोडकेला तीन सेटमध्ये २२-११, १८-२५ व २५-३ असे हरविले. तर रिंकीने अंतिम फेरी गाठण्यापूर्वी अनुभवी राष्ट्रीय विजेत्या संगीता चांदोरकरला २५-४, २०-१४ असे सहज नमविले.
विजेत्या खेळाडूंना चेंबूर जिमखान्याचे अध्यक्ष बाळकृष्ण वाधवान, सल्लागार सुरिंदर शर्मा, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक चेंबूरचे शाखाधिकारी मंदार चाचड, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग मॅनेजर मोहित नारंग यांच्या हस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे सूत्र संचलन कॅरम व बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब यांनी केले. या प्रसंगी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहचिटणीस केतन चिखले, मुंबई उपनगर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण उपस्थित होते.