मुंबई :
मुस्लिम समुदयाची हज यात्रा संपल्यानंतर सौदी अरेबियातून हज यात्रेकरूंचे मायदेशी परतीचे काम सुरु झाले असून इंदौर, भोपाळ, जबलपूर आदी शहरातून हज यात्रेकरू मुंबईत येऊ लागले आहेत. त्यांच्या मदतीसाठी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मदत कक्ष बांधले असून या ठिकाणी सर्व प्रकारची मदत त्यांना दिली जात आहे.
मध्य प्रदेश सरकारचे माजी सचिव, धार जिल्हा हज कमिटी आणि मौलाना कमाल उर्स कमिटीचे सचिव रफिउद्दीन सय्यद यांनी सांगितले की, खासदार संजय दिना पाटील यांनी हज यात्रेकरुंसाठी चांगल्या सुविधा सुरु केल्या आहेत. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी हे मदत कक्ष बांधण्यात आले आहे. या ठिकाणी हज यात्रेकरुंचे आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत केले जाते. या ठिकाणी त्यांना आंघोळीसाठी पाणी देण्यात येते. जेणेकरुन ते नमाज अदा करु शकतील. हज यात्रेकरुंना आरोग्य विषयक काही तक्रार असल्यास या ठिकाणी डॉक्टरांची एक टीम तैनात करण्यात आली आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची सुविधा करण्यात आली असून हज यात्रेकरुंचे सामान रेल्वे डब्ब्यापर्यत ने आण करण्यासाठी मदतनीस ठेवण्यात आले आहेत. या सुविधांमुळे अनेकांना त्याचा फायदा होत असून हजयात्री आणि त्यांच्यासोबत येणारे नातेवाईक यांनी खासदार संजय दिना पाटील यांचे आभार मानले आहे. त्यांच्या या समाज सेवेमुळे समाजात एकोप्याचा संदेश जाईल असे समाजसेवक अजीज मक्की यांनी सांगितले.
हज यात्रेकरुंना या सुविधा दिल्याबद्दल ऑल इंडिया हज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष मुकित खान आणि राष्ट्रीय महासचिव सैय्यद रियाज अली यांनी खासदार संजय दिना पाटील यांचे आभार मानले आणि मुंबईत त्यांचा सत्कार करण्याचे सांगितले.