मुंबई :
धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात येऊ नये म्हणून प्रयास संस्थेच्यावतीने मुलुंडमध्ये रविवारी सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात मुलुंडकर सहभागी होणार असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आंदोलनाचे आयोजक अँड. सागर देवरे यांना नवघर पोलिसांनी नोटीस दिली आहे.
अपात्र असलेल्या धारावीकारांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात येणार असल्याने मुलुंड परिसरात ७५०० घरे बांधण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी मिठागरांची जमीन अधिग्रहन करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. लाखो धारावीकारांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये झाल्यास नागरी सेवांवर याचा ताण पडणार आहे. या आधीच मुलुंडमध्ये वाहतूक कोंडीची गंभीर समस्या असून आरोग्याशी निगडीत सुविधांवरही याचा ताण पडणार आहे. त्यामुळे धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच करण्यात यावे, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र मुलुंडकरांना ग्राह्य न धरता या ठिकाणी धारावीकरांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, अँड. सागर देवरे आणि मुलुंडकर रविवारी सकाळी मराठा मंडळ गेट, मुलुंड पुर्व या ठिकाणी आंदोलन करणार आहे. या आंदोलनात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, घडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. यासाठी अँड. सागर देवरे यांना नवघर पोलिसांनी नोटीस दिली आहे.