मुंबई :
एसटी (Msrtc) सेवेतून निवृत्त झालेल्या, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या, अधिकारी, कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या पती व पत्नीस, तसेच सेवेत असताना मृत्यू पावलेल्या, सेवानिवृत्तीनंतर मृत्यू पावलेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी, विधवा – विधूर यांना त्यांच्या वयाच्या ७५ वर्षांपर्यंत मोफत प्रवास पास एसटी महामंडळाकडून (Msrtc) देण्यात येतो. मात्र, असे असले तरी राज्यातील काही विभागांत मोफत प्रवास पासापासून ज्येष्ठांना वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी एसटी महामंडळाकडे (Msrtc) प्राप्त झाल्या आहेत.
गेल्या काही वर्षांत ज्येष्ठ आणि महिला प्रवाशांकडून एसटीला (Msrtc) सर्वाधिक पसंती देण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे महिलांना तिकिटात असणारी ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना असणारी मोफत प्रवासाची मुभा. यासोबत अनेक सवलती आणि मोफत पास सुविधाही देण्यात आल्या आहेत. मात्र, बऱ्याच विभागांत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीस मोफत प्रवास पासापासून वंचित ठेवून परिपत्रकीय सूचनांचा भंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तशा तक्रारी प्रशासनाला (Msrtc) प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी आगार प्रमुखांनी जबाबदारी घेत ज्येष्ठांना नियमानुसार सेवा देण्याचे आवाहन एसटी महामंडळाने (Msrtc) केले आहे. तसेच याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.