मुंबई :
प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून १०० वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वरळी येथील एन.एस.सी.आय.डोम येथे आयोजित प्रो गोविंदा लीगच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मिलिंद देवरा, आमदार प्रताप सरनाईक, मोहम्मद दुराणी, पुर्वेश सरनाईक आदिंसह स्पर्धांचे आयोजक, संघ मालक, गोविंदा पथक उपस्थित होते.
खेळामध्ये स्पर्धा असली पाहिजे, पण ती जीवघेणी नसावी. त्यामुळे यंदा आपण सर्वांनी अपघातमुक्त गोविंदा उत्सव साजरा करूया असे आवाहन करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ सुरू आहे. या खेळाचा समावेश साहसी क्रीडा प्रकारामध्ये करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक गोविंदा उपस्थित आहेत. या गोविंदांच्या विमा संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेतली आहे. यंदाच्या वर्षी ७५ हजार गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे. भविष्यात हा खेळ ऑलिंपिकमध्ये सहभागी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यंदा आपण ६० गोविंदांना स्पेनला पाठवतो आहोत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, खेलो इंडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळेच आपण ऑलिंपिकमध्ये ६ पदक जिंकली आहेत. त्यामध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याचाही समावेश असल्याचा अभिमान आहे. शासन युवक आणि युवतींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आता लाडकी बहीण प्रमाणेच लाडका भाऊ योजना आणली आहे. कौशल्य विकासच्या माध्यमातून युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थींना मानधन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. या स्पर्धांमध्ये एकूण ३२ संघ सहभागी झाले होते. त्यापैकी १६ संघांनी आजच्या अंतिम फेरीत आपले कौशल्य सादर केले. यंदाच्या वर्षी सातारा सिंघम यांनी प्रथम क्रमांक पटकावला.