मुंबई :
भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर बस डेपो नसल्याने या ठिकाणी दाटीवाटीने उभ्या राहणाऱ्या बेस्टच्या बसेसमुळे या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लांबच लांब रांगा लावून बसची वाट पाहावी लागते. त्यामुळे प्रवाशांना नाहक गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. याला पर्याय व्यवस्था म्हणून भांडुप रेल्वे स्थानकाजवळ पालिकेच्या पाण्याच्या चौकीच्या जागेवर बस डेपो चालू करण्याचा पालिकेचा विचार करीत आहे. तसेच पाण्याच्या चौकीची इमारत ही पहिल्या माळ्यावर सुरु ठेवता येईल. त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात तेथे दोन कंटेनर ठेवण्यात येणार आहे.
भांडुप पश्चिम येथून कोकण नगर, भट्टी पाडा, गाढव नाका आदी ठिकाणी जाण्यासाठी बेस्ट प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यातच रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या मार्गावर मोठ्य प्रमाणावर फेरीवाले, रिक्षा आणि कमी जागेत असलेल्या बस डेपोमुळे येथून प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या प्रमाणार गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सकाळी तसेच संध्याकाळी गर्दीच्या वेळेत रेल्वेने प्रवास करताना या गर्दीतून वाट काढीत रेल्वे स्थानक गाठावे लागते. याला पर्याय म्हणुन ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी भांडुप रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पालिकेच्या आरक्षित जागेवर बस डेपो तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करण्यास सांगितले होते. खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या प्रयत्नानंतर भांडुप स्टेशनवर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच बेस्ट बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे. यासाठी मुंबई पालिका परिमंडळ सहाचे प्रभारी उपायुक्त संतोषकुमार धोंडे, शिवसेनेचे आमदार रमेश कोरगावकर, एस विभागाचे सहाय्यक आयुक्त व इतर संबंधीत पालिका अधिकारी उपस्थित होते.