मुंबई :
केवळ दीड महिन्यांपूर्वी बांधलेली आधार भिंत व दरड कोसळल्याने चार घरे बाधीत झालेली असून काही दुकानांचेही या भिंतीमुळे नुकसान झाले आहे. हा प्रकार विक्रोळी पार्क साईट या ठिकाणी झाला असून तातडीने ही भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे.
पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडून अनेकांचे बळी जातात. त्यामुळे विक्रोळी येथे आधार भिंत बांधण्यात आली होती. मात्र आज पहाटे विक्रोळी येथील लोकमान्य नगर, टाटा पावर हाऊस जवळ, वर्षानगर या ठिकाणी दरड कोसळली. ही दरड आधार भिंतीवर पडल्याने सर्व मलबा घरांवर पडला. त्यामुळे या घटनेत चार घरे व काही दुकानांचे नुकसान झाले. घटनास्थळावर युवासेना कार्यकारीणी सदस्य राजोल संजय पाटील, शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका स्नेहल मोरे यांनी धाव घेऊन बाधीतांना सर्वोतोपरी मदत केली. याबाबत ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी ही आधार भिंत तातडीने बांधण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.