मुंबई :
महिलांचे वाढते वय, मासिक पाळी बंद झाल्यावर महिलांमध्ये निर्माण होणारी प्रथिनांची कमतरता यामुळे दरहजारी २० महिलांमध्ये गर्भाशयाचा प्रोलॅप्स या आजाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेकदा महिलांना विविध त्रासाला सामोरे जावे लागते. महिलांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी ‘प्रोपेल्विक सपोर्ट अंतर्वस्त्र’ तयार केले आहे. या संशोधनासंदर्भातील पेटंट नुकतेच डॉ. तुषार पालवे यांना मिळाले. यामुळे या वर्षात पालवे यांच्या नावावर दोन पेटंट झाले आहेत.
महिलांमध्ये गर्भाशयाचा प्रोलॅप्स या आजाराने अनेक त्रस्त महिला कामा रुग्णालयात उपचारासाठी येतात. यामध्ये ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महिलांचा समावेश अधिक आहे. आरोग्याबाबत जागरूकता नसल्याने या भागातील अनेक महिलांमध्ये ही समस्या प्रामुख्याने जाणवते. गर्भाशयाचा प्रोलॅप्समध्ये वाढत्या वयानुसार मासिक पाळी बंद झाल्यावर तसेच अनेकवेळा प्रसूती झाल्यावर गर्भाशयाला आवश्यक असलेले अस्थिबंधन सैल होते. परिणामी महिलेचे गर्भाशय त्याच्या जागेवरून खाली सरकते. त्यामुळे महिलांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. यावर शस्त्रक्रिया करणे हा उपाय असला तरी अनेक महिला शस्त्रक्रिया करण्यास टाळतात. त्यामुळे एक विशिष्ट रिंग वापरली जात असे. मात्र ही रिंग डॉक्टरांच्या सल्ल्याने लावली जाते. तसेच ही रिंग शरीरामध्ये बराच दिवस राहिल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांची कोंडी होत असे, ही बाब लक्षात घेत स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. तुषार पालवे यांनी दीड वर्ष संशोधन करून सिलिकॉन बल्बच्या माध्यमातून ‘प्रोपेल्विक सपोर्ट अंतर्वस्त्र’ तयार केले. याचा वापर करण्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाही. तसेच महिला याचा सहज वापर करू शकतात. ज्या महिलांना तातडीने शस्त्रक्रिया करणे शक्य नाही, ज्यांना उच्च रक्तदाब. मधुमेह, हृदयविकार सारखे आजार आहेत, त्यांच्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘प्रोपेल्विक सपोर्ट अंतर्वस्त्र’ या संशोधनाला नुकतेच पेटंट मिळाले असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.
दरम्यान यापूर्वी पालवे यांनी गर्भधारणा होत नसलेल्या महिलांची तपासणी करण्यासाठी वापरण्याचे उपकरण शोधले आहे. पूर्वी तपासणी करताना दोन उपकरणाचा वापर करावा लागत असे, मात्र पालवे यांच्या संशोधनामुळे आता एकच उपकरण वापरले जाते. तसेच यामुळे गर्भाशयाच्या मुखाला जखमही होत नाही. डीसीपी कॅन्युला असे या उपकरणाचे नाव आहे.