आरोग्य

पंढरपूरच्या वारीतील महाआरोग्य शिबिराची ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

मुंबई :

‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ या मोहीमेंतर्गत यंदा पंढरपूरच्या आषाढी वारीत १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची रुग्णसेवा करण्यात आली. या मोहीमेंतर्गत आरोग्य विभागाने राबवलेल्या महाआरोग्य शिबिराची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ने घेतली आहे. हा विक्रम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. १५ लाखांहून अधिक वारकऱ्यांच्या तपासणीची जबाबदारी पार पाडणारे आरोग्य विभाग हे खऱ्या अर्थाने वारकऱ्यांसाठी आरोग्यदूत ठरले आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यातून या दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरवून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने विक्रमी कामगिरी बजावली आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते.

देहु-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यातील पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी १४ ते १८ जुलै २०२४ या कालावधीत वाखरी, गोपाळपुर, तीन रस्ता, ६५ एकर पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांना आणि भाविकांना विविध आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात आल्या. वारीदरम्यान भरवण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात लाखो वारकऱ्यांना वेळेवर आणि सहज, दर्जेदार उपचार मिळाले, तर काहींचे जीव वाचले. तसेच पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक व उपचारात्मक, आरोग्य संदर्भ सेवा देण्यात आली.

आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमामुळे पंढरपूरच्या वारीला एक नवी ओळख मिळाली आहे. जगातील सर्वात मोठ्या आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दलची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ने केली आहे. या महाआरोग्य शिबिरात १५ लाख १२ हजार ७७४ वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली. त्यासाठी ७ हजार ५०० डॉक्टर आणि निम्नवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *