मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या कौशल्याधारीत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत सहा नवीन प्रमाणापत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. रिटेल बँकर, वेल्थ मॅनेजर, म्युच्यूअल फंड डिस्ट्रीब्युटर्स, पायथन प्रोग्रामिंग, डेटा सायन्स बेसिक्स आणि इंटरमिडीएट असे हे सहा २ क्रेडिटचे ओपन इलेक्टिव्ह कोर्सेस आहेत. हे सर्व कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्यासाठी आज ‘हुनरहो’ संस्थेशी शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेचे संचालक डॉ. केयुरकुमार नायक, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता प्रा. कविता लघाटे यांच्यासह ‘हुनरहो’ संस्थेचे संस्थापक डॉ. अजय श्रीवास्तव आणि नेटवर्किंग हेड नेहा सिंह उपस्थित होत्या.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शिकतानाच व्यावसायिक तथा कौशल्याधारीत शिक्षण, प्रशिक्षण, इंटर्नशिप, कार्यांतर्गत प्रशिक्षण मिळावे या अनुषंगाने गरवारे शिक्षण संस्थेने हे पाऊल टाकले आहे. या अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांला या २ क्रेडिटच्या ओपन इलेक्टिव्ह प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी प्रविष्ठ होता येईल. माहिती तंत्रज्ञान, वित्त आणि विपणन क्षेत्रातील तथा उद्योन्मुख क्षेत्रातील गरजा व संधी लक्षात घेऊन या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली असून, अशा ओपन इलेक्टिव्ह कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कौशल्यवृद्धीस नक्कीच हातभार लागणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या या २ क्रेडिटच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील कोणताही विद्यार्थी त्यांच्या सवडीप्रमाणे प्रविष्ठ होऊ शकेल असे संस्थेचे संचालक डॉ. केयुरकुमार नायक यांनी सांगितले.