मुंबई :
नवसाला पावणारा विश्वाचा राजा अशी ओळख असलेला जीएसबी गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे गुरुवारी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी जल्लोषात विसर्जन करण्यात आले. पाच दिवस असलेल्या या गणरायाची मिरवणूक बुधवारी रात्री ११ वाजता वडाळा येथून काढण्यात आली होती.
पाच दिवसांच्या गणपतीना बुधवारी मोठ्या उत्साहात व जल्लोषात निरोप देण्यात आला. जुहू चौपाटी, दादर चौपाटी व गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी करून गणरायाला निरोप दिला. मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती आणि नवसाला पावणारा विश्वाचा राजा अशी ओळख असलेला वडाळा जीएसबी मंडळाच्या गणपतीच्या मिरवणुकीला बुधवारी रात्री ११ वाजता जल्लोषात सुरुवात करण्यात आली. जीएसबी सेवा मंडळ येथून निघालेली ही मिरवणूक माटुंगा – किंग सर्कल येथील आर ए किडवाई मार्ग, महेश्वरी उद्यान, दादर टीटी, प्लाझा सिनेमा, शिवाजी पार्क, सिद्धिविनायक मंदिर, वरळी नाका, ताडदेव, नाना चौक अशी मार्गक्रमणा करत गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचली. यावेळी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गणरायाची आरती करत त्याला भावपूर्ण निरोप दिला.
या वर्षी ८०,००० हुन जास्त पूजा
दरवर्षी लाखो गणेश भक्त जीएसबी सेवा मंडळ, किंग सर्कल येथे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. या मंडळात बाप्पाच्या विविध प्रकारच्या पूजा देखील होत असतात. या वर्षी ८०,००० अनेक गणेश भक्तांनी सेवा रुपी पूजा बाप्पाला अर्पण केली.
दिग्गजांची हजेरी
या मंडळात उत्सव काळात सामान्य भाविकांसह दिग्गज राजकीय नेत्यांनी देखील हजेरी लावली. यात राज्याचे मंत्री दीपक केसरकर, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठकरे. तसेच बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय , अभिनेता जितेंद्र, पूजा हेगडे यांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले.
सालाबादप्रमाणे यंदा देखील अत्यंत भक्तिमय वातावरणात सर्व गणेश भक्तांनी अत्यंत भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
– अमित पै, अध्यक्ष