मुंबई :
राज्यभरातील डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मागील काही वर्षांपासून भरघोस प्रतिसाद दिलेला आहे. शालेय शिक्षणानंतर कमी कालावधीत तंत्र शिक्षणातील डिप्लोमा हा रोजगारक्षम बनवण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. दरवर्षीनुसार तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील डिप्लोमा स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया या वर्षी देखील जूनमध्ये सुरु करण्यात आली होती. या अभ्यासक्रमांच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या २०२०-२१ मध्ये ६२ हजार १२२ होती, ही संख्या २०२४-२५ मध्ये ९५ हजार २४६ झालेली आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्त्याने वाढ होत आहे.
पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश वाढविण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशिक्षण संचालनालयाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व राज्यातील पॉलिटेक्निकद्वारे “स्कुल कनेक्ट” हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. समुपदेशन सभा, जनजागृती मोहीम, जाहिराती, रेडिओ मुलाखती अशा विविध उपक्रमांद्वारे अध्यापकांनी आपले योगदान दिले आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रामुख्याने दहावी (SSC) च्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पदविका अभ्यासक्रम, त्याचे फायदे व त्याची प्रवेश प्रक्रिया याबाबत माहिती पुरवण्यात येते. राज्यातील गावोगावातील शाळांमधील दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती डाटाबेसच्या स्वरूपामध्ये संकलित केली जाते व त्यांना प्रवेशप्रक्रियेच्या वेळी सर्वोतोपरी मार्गदर्शन केले जाते.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत विविध AICTE मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रम विकसित करण्यात येऊन मंडळाशी संलग्नित पॉलिटेक्निकमार्फत राबविण्यात येतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींचा अंतर्भाव करुन सध्याच्या पदविका अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करुन सुधारित K-Scheme पाठ्यक्रम शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. हा अभ्यासक्रम परिणाम आधारित (Outcome Based) असून, क्रेडिट सिस्टमवर आधारित आहे. विद्यार्थ्यांकरिता विषयांचे आकलन व परीक्षा देणे सुकर होण्याच्या दृष्टीने, अध्यापनाकरिता व परीक्षेत उत्तरे लिहिण्याकरिता द्विभाषिकेचा पर्याय (इंग्रजी व मराठी) उपलब्ध करून देण्यात आला आहे व मंडळाच्या संकेत स्थळावर द्विभाषिक शिक्षण सामुग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना आवडीनुसार शिक्षण घेण्यासाठी मार्ग बदलणे, तसेच पूर्ण केलेल्या शिक्षणाच्या टप्प्यानुसार योग्य रोजगार संधी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून मल्टीपल एन्ट्री मल्टीपल एक्झिटची तरतूद करण्यात आली आहे. National Credit Framework च्या मार्गदर्शक सुचनांनुसार क्रेडिट संकलन प्रणाली अंगिकारली असून NAD (National Academic Depository) च्या Academic Bank of Credits (ABC) मध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले क्रेडिट्स जमा करण्यात येतात.
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकास
विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार Financial Literacy, Universal Human Values, उन्नत महाराष्ट्र अभियानातील उद्देशानुसार स्थानिक गरजांना अभ्यासून त्यावरिल तंत्रज्ञानावर आधारित योजनांवर काम करण्याच्या संधी, सामाजिक सामुदायिक सेवेचा पर्याय ( NSS ) तसेच Yoga Health and Wellness या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धन संबंधीत बांधिलकीचे ज्ञान असण्याकरिता Environment and Sustainability या विषयाचा तसेच भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge System) विषयीची माहिती विविध विषयांमध्ये अंतर्भुत करण्यात आली आहे. त्याचबरोबर Essence of Indian Constitution, Management तसेच Entrepreneurship and Startup या विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. विषयांचे आकलन व Presentation skills वाढविण्याकरिता Seminar या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
प्रकल्प आधारित अध्ययन
प्रकल्प आधारित अध्ययन (प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग) च्या अनुषंगाने तसेच एक्सपिरीमेंटल लर्निंग या संकल्पनेचे महत्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये टेक्निकल स्किल रुजविण्याकरिता पाठ्याक्रमातील उपक्रमांमध्ये मायक्रो प्रोजेक्टचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच कॅपस्टोन प्रोजेक्ट या विषयाद्वारे विद्यार्थ्यांना प्रकल्प तयार करणे, त्याचे सादरीकरण करणे या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रातील जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण (इंडस्ट्रियल ट्रेनिंग) हे या आधीच्या अभ्यासक्रमात असलेल्या ६ आठवडयांच्या कालावधीवरून सध्याच्या अभ्यासक्रमात किमान १२ आठवड्यांचे करण्यात आले आहे.
स्वयंअध्ययनाचे मूल्यांकन
डिजिटल मीडिया म्हणजेच MOOCs चा प्रभावी उपयोग करण्याच्या दृष्टीने पाठ्याक्रमातील उपक्रमांमध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लावण्याकरीता स्वयंअध्ययनाचे मूल्यांकन (सेल्फ लर्निंग असेसमेंट) करण्यात येत आहे. सततच्या बदलणा-या तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना अद्यावत करणेकरिता “इमर्जिंग ट्रेंड इन प्रोग्राम” या विषयाचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्यात आला आहे.
रोजगारक्षमता
१० वी नंतर कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेवून अभियंता होण्यासाठी व तद्नंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. तीन वर्षाचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुपरवायझर ते मॅनेजर पदापर्यंत जावू शकतात वा विद्यार्थी आपला स्वतःचा उद्योग सुरु करुन त्यांना उद्योजक सुध्दा होता येते. पदविका शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात पात्रतेनुसार प्रवेश घेण्याची संधीही उपलब्ध राहते. हे सर्व उपक्रम चंद्रकांत पाटील, मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या कुशल नेतृत्वामुळे शक्य झालेले आहेत. त्याचबरोबर उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन प्राप्त झालेले आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे विद्यार्थ्यांना दर्जेदार, करिअर आणि रोजगाराभिमुख तांत्रिक शिक्षण देण्याचा तसेच तंत्र शिक्षण देणाऱ्या संस्थाना उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी यापुढेही असे दर्जेदार उपक्रम निरंतर सुरु ठेवण्यात येतील. राज्यातील तंत्रशिक्षणाशी संबंधित विद्यार्थी, पालक, संस्था, उद्योगधंदे, विद्यापीठे इत्यादी अशा सर्वच भागधारकांकडून सहकार्य, समन्वय, सहयोग यापुढेही सुरु रहावा अशी संचालनालयाची अपेक्षा आहे.