मुंबई :
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८(२)(न) नुसार अधिसभेवर १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे. १० जागांवरील निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार असून या निवडणुकीसाठी एकूण १३ हजार ४०६ मतदार आहेत. मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बुथवर ही निवडणूक पार पडणार आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर केंद्रनिहाय आणि बुथनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून मतदार त्यांच्या नावाने आणि मोबाईल फोन क्रमांकाच्या आधारे त्यांचे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र आणि बुथ क्रमांक पाहू शकतील.
विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने या निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. ३८ केंद्र आणि ६४ बुथसाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदार केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले असून पुढील प्रशिक्षण १९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी सर्वच स्तरातून सहकार्य अपेक्षित असून २५ सप्टेंबर २०२४ रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.