मुंबई :
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) बीएस्सी नर्सिंग, सहाय्यक परिचारिका प्रसाविका (एएनएम), सामान्य परिचर्या व प्रसाविका (जीएनएम) या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत वाढविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी संपणारी प्रवेश प्रक्रिया आता ३१ ऑक्टोबर रोजीपर्यंत सुरू राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेचा कालावधी वाढल्याने आणखी एक प्रवेश फेरी राबवली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची चौथी फेरी २३ सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर २४ सप्टेंबरपासून संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार होती. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाबरोबरच सहाय्यक परिचारिका प्रसाविका (एएनएम), सामान्य परिचर्या व प्रसाविका (जीएनएम) या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबर रोजी संपुष्टात येणार होती. मात्र भारतीय परिचर्या परिषदेने २३ सप्टेंबर रोजी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या तिन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आता ३१ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. पुढील प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक लवकरच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर जाही करण्यात येणार आहे. दरम्यान प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याने बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची आणखी एक प्रवेश फेरी राबविली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बीएस्सी नर्सिंगच्या प्रवेशासाठी सरकारी महाविद्यालयात २५० तर खासगी महाविद्यालयात १० हजार ७२० अशा १० हजार ७२० जागा उपलब्ध होत्या. या फेऱ्यांसाठी राज्यातील ५८ हजार ६३५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील ५० हजार २१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये ३७ हजार ५२४ मुली तर १२ हजार ६१९ मुलींचा समावेश होता.