शहर

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार ‘हर घर दुर्गा’ अभियानाचा शुभारंभ – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : 

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिलांसाठी आज एक महत्वाची घोषणा केली. “नवरात्र अर्थात शक्तिरूपिणी दुर्गेचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. ज्याप्रमाणे दुर्गा देवी हे शक्तीचे प्रतीक असून, वाईट प्रवृत्तींचा नाश करते त्याचप्रमाणे समाजातील नराधमांना धडा शिकवणारी दुर्गा प्रत्येक घरात असावी या उद्देशाने आम्ही ‘हर घर दुर्गा’ अभियान सुरू करत आहोत.” असे मंत्री लोढा म्हणाले

या अभियानामार्फत राज्यातील शासकीय औद्योगिक संस्थांमधील तरुणींना स्वरक्षणाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण फक्त काही दिवसांपुरते मर्यादित राहणार नसून, शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये संपूर्ण वर्षभर आठवड्यातून २ ते ३ वेळा तासिका स्वरूपात हे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. तसेच शासकीय औद्योगिक संथांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीं व्यतिरिक्त इतर महिला देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात, असे मंत्री लोढा यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

३० सप्टेंबर रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते हर घर दुर्गा अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर केरळा स्टोरीज चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्मा यावेळी उपस्थित राहणार आहे.

या अभियानामार्फत प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांची नेमणूक करण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे इतर विषयांचे अभ्यासक्रम आणि तासिका असतात त्याप्रमाणे आत्म संरक्षणाच्या सुद्धा तासिका असाव्यात अशी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांची संकल्पना होती. त्यानुसार ‘हर घर दुर्गा अभियान’ उदयास आले आहे.

“नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना सर्व उत्सव मंडळांना हे निवेदन आहे महिलांसाठी उत्सवाचा एक भाग म्हणून स्वसंरक्षण शिबिराचा एक कार्यक्रम ठेवावा. मुंबई, ठाणे परिसरात मंडळांना असा कार्यक्रम करण्याची इच्छा आहे आणि प्रशिक्षक मिळावा अशी अपेक्षा आहे त्यांना आम्ही ट्रेनर्स सुद्धा उपलब्ध करून देऊ. हा महिलांचा उत्सव आहे, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही तत्पर आहोत. सर्व मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांनी आमची साथ द्यावी” असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.

त्या व्यतिरिक्त राज्यातील १४ ITI चे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे नुकताच घेण्यात आला. त्या अनुषंगाने कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामकरण महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक संस्था असे करण्यात येणार आहे. तसेच स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये HP कंपनीच्या सहकार्याने अत्याधुनिक दर्जाचे डिजिटल एक्सलन्स सेंटर उभारण्यात आले असून, त्याचे देखील उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *