सिमडेगा (झारखंड) :
पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू झालेल्या ३४ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाने सिक्कीमचा धुव्वा उडवित विजयी सलामी दिली.
झारखंड राज्य खो-खो असोसिएशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत साखळीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या किशोरी संघानी सिक्कीमवर १ डाव ५६ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. महाराष्ट्र संघाकडून अपर्णा वर्धेने सहा मिनिटे संरक्षण केले. राही पाटीलने अष्टपैलू खेळ करताना ३.१० मिनिटांनी संरक्षण करीत आक्रमणामध्ये २ गडी बाद केले. प्रणिती जगदाळे व वेदिका तामखडे यांनी आपल्या धारदार आक्रमणात अनुक्रमे ४ व ३ गडी बाद केले.
अन्य सामन्यांमध्ये सामन्यात कोल्हापूरच्या किशोरी संघास पराभव पत्करावा लागला. त्यांना ओडिसा संघाने १० गुणांनी मात केली. कर्नाटकने मध्यप्रदेशवर १ डाव आणि २० गुणांनी सहज विजय मिळविला. दिल्लीने त्रिपुराचा, छत्तीसगडने अरुणाचल प्रदेशला हरविले.
किशोर गटात कर्नाटकने झारखंडचा, हरियाणाने मणिपूरचा, तेलंगणाने उत्तराखंडचा तर दिल्लीने पुद्दुचेरीचा पराभव करत गटातील आपले सलामीचे सामने जिंकले.