कल्याण :
कल्याणमधील लॉजवर नेऊन २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी अभिजीत जोगदंड (२५) याला महात्मा फुले पोलिसांनी परभणी येथून अटक केली आहे. त्याला आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
आरोपी अभिजीत हा मूळचा परभणी येथे राहणारा आहे. तरुणी नांदेड जिल्ह्यातील एका गावात राहणारी आहे. रेल्वे गाडीत प्रवासादरम्यान तरुणीसोबत अभिजीतची ओळख झाली. प्रवासात त्याने तिच्याशी चांगली मैत्री केली. या मैत्रमधूनच त्याने तिला कल्याण रेल्वे स्थानकात उतरण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून ती कल्याण रेल्वे स्थानकात उतरली. त्यानंतर तो तिला जवळच्याच एका लॉजवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने त्याला जवळीक करण्यास तेथे विरोध केला. त्यावर त्याने तू टेन्शन घेऊ नकोस मी तुझ्याशी लग्न करणार आहे असे सांगून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर त्याने त्याचे मामा मामी बदलापूरला राहतात. त्याठिकाणी जाऊ अशी बतावणी केली. परंतु तिला बदलापूर येथे कुठे तरी सोडून तो पसार झाला. पिडीत तरुणीने अभिजीतला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याचा काही प्रतिसाद नसल्याने तिने महात्मा फुले पोलिस ठाणे गाठले. ऑगस्ट महिन्यात आरोपी अभिजीत याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक प्रतिभा माळी करीत होते. या प्रकरणात आरोपीला परभणी येथून पोलीस अधिकारी किरण वाघ यांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले.
आरोपीची ओळख परेड करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.