आरोग्य

क्या हुआ तेरा वादा; हाफकिनच्या कर्मचाऱ्यांचा राहुल नार्वेकरांना सवाल

मुंबई :

२०१४ पासून हाफकिन महामंडळातील एकाही कर्मचाऱ्याला शासनाकडून आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे जवळपास २१० कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे जाहीर आश्वासन दिले. मात्र निवडणुका होताच त्यांचे आश्वासन हवेत विरले असून, क्या हुआ तेरा वादा असा प्रश्न हाफकिनच्या कर्मचाऱ्यांकडून राहुल नार्वेकरांना यांना विचारण्यात येत आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना सेवाकाळात दोन ते तीन वेळा पदोन्नती मिळावी यासाठी आश्वासित प्रगती योजना लागू केली आहे. २०१४ पर्यंत हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळत होता. परंतु २०१४ मध्ये लेखा परीक्षा अधिकारी यांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे २०१४ पासून हाफकिनमधील कर्मचारी आश्वासित प्रगती योजनेपासून वंचित राहिले. या योजनेमुळे हाफकिनवर वार्षिक १३ कोटी ५७ लाख रुपये भार पडणार आहे. हा भार पेलण्यास महामंडळ सक्षम असल्याचे महामंडळाने कळवल्यानंतर वैद्यकिय शिक्षण व औषध विभागाने वित्त विभागाच्या मंजूरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. त्याला परवानगी न मिळाल्याने हाफकिन महामंडळातील २१० कर्मचारी २० वर्षांपासून पासून एकाच पदावर कार्यरत आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निवडणुक लढविण्यास इच्छुक असल्याने त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी हाफकिनमधील कर्मचाऱ्यांना तातडीने आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते. तसे शिवडी, परळ भागामध्ये फलकही लावण्यात आले. त्यामुळे हाफकिनमधील कर्मचाऱ्यांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला. मात्र नार्वेकरांना निववडणुकीमध्ये उमेदवारी जाहीर न झाल्याने त्यांनी हाफकिनच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. याबाबत हाफकिन महामंडळातील कर्मचारी संघटनेकडून वारंवार पाठपुरावा करूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हाफकिनमधील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे हा नार्वेकरांचा ‘चुनावी जुमला’ होता का असा प्रश्न हाफकिनमधील कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.

वित्त विभागाची त्यासाठी परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुूरू आहे. कामगारांचे अधिकार कामगारांना मिळणारच, त्यासाठी या प्रश्नाचा मी स्वत: जातीने पाठपुरावा करत आहे. लवकरच त्यांचा प्रश्न सुटेल.
– ॲड. राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *