शहर

MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांची ७०० कोटी रुपयांची पीएफ रक्कम १० महिन्यांपासून थकीत

राज्य सरकार बेपर्वाईने वागत असल्याची श्रीरंग बरगे यांची टीका

मुंबई :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून कपात केलेली ७०० कोटी रुपयांची रक्कम पी. एफ. ट्रस्टकडे एसटीने भरली नसल्याने आपल्या पीएफमध्ये जमा असलेल्या रक्कमेतून ऍडव्हांस मागणी करणारे ३००० कर्मचारी जुलैपासून पीएफ ऍडव्हांस रक्कमेच्या प्रतीक्षेत आहेत. गेले अनेक महिने सरकारकडून येणारी सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम अपुरी येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली पी. एफ. रक्कम ट्रस्ट कडे जमा केली जात नाही. साहजिकच त्यामुळे कर्मचाऱ्यांना पी एफ ऍडव्हांस मिळत नसल्याने आर्थिक झळ सोसावी लागत आहे. विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एसटीला निधी देण्यात राज्य सरकार बेपर्वाईने वागत असल्याची टीका महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व गॅज्युटी (उपदान) दोन स्वतंत्र ट्रस्ट असून ८७ हजार एसटी कर्मचारी व अधिकारी यांची भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची अंदाजे ७०० कोटी रुपये व उपदान म्हणजे गॅज्युटीची अंदाजे १००० रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे १७०० कोटी रुपयांची रक्कम गेले दहा महिने एसटीने दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही. पीएफ ट्रस्टमधून कर्मचारी आपल्या खात्यावरील जमा रक्कमेतून आर्थिक अडचणीवेळी ऍडव्हांस रक्कम घेत असतात, पण गेले दहा महिने सरकारकडून अपुरा निधी येत असल्याने एसटीने पीएफ रक्कम ट्रस्टकडे जमा केली नाही. त्यामुळे ट्रस्टच्या तिजोरीत खडखडाट असून राज्यभरातील एसटीच्या ३००० कर्मचाऱ्याना जुलैपासून आतापर्यंत पीएफची ऍडव्हांस रक्कम मिळाली नाही. आपलीच रक्कम आपल्याला मिळत नसल्याने कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले असून स्वतःचे आजारपण किंवा कुटुंबियांचे आजारपण, मुलामुलींची लग्ने, शाळा, कॉलेजची फी भरण्यासाठी सुद्धा हे पैसे वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. याला मागणीच्या तुलनेत अपुरा निधी देणारे सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे. एसटीला निधी देण्यात राज्य सरकार बेपर्वाईने वागत असल्याची टीका महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

सवलत मूल्य प्रतिपूर्ती निधी

एसटी महामंडळ प्रवाशांना तिकीट दरात विविध प्रकारच्या सवलती देते त्याची दर महिन्याला सरकारकडून प्रतिपूर्ती रक्कम येत असते. मागणी केलेली पूर्ण रक्कम सरकारने कधीही एसटीला दिली नसून त्यामुळे विविध अडचणीचा सामना एसटी महामंडळाला करावा लागत असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *