शिक्षण

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे स्थलांतर

मुंबई :

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद तसेच मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठवा ते दहावा मजला या जागेत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते स्थलांतरित कार्यालयांचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद तसेच मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय असलेल्या जागेवर भव्य मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असून लवकरच मराठी भाषा भवन चे भूमिपूजन होणार आहे. यासाठी या इमारतीमधील कार्यालयांचे मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या इमारतीत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. या कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे आदी उपस्थित होते.

या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले, शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थी हिताचे विविध निर्णय घेण्यात आले आहेत. ‘समग्र शिक्षा’ च्या माध्यमातून उत्कृष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणावरही भर देण्यात येत आहे. जागतिक स्तरावर आवश्यक असणारे प्रशिक्षण देण्याचाही आपला प्रयत्न आहे, याचाच एक भाग म्हणून पात्र आणि इच्छुक युवकांना जर्मनीतील बाडेन वुटेमबर्ग राज्यात रोजगार मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषा विभागामार्फत भाषा धोरण जाहीर झाले आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, मराठी भाषा भवनचे लवकरच भूमिपूजन होणार आहे. हे करीत असताना विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील कार्यालयात उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगून या कार्यालयांतून दर्जा उंचावणारे काम व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी प्रास्ताविक करताना स्थलांतरित कार्यालयात आवश्यक सोयी सुविधा तातडीने उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. या कार्यालयातून ‘समग्र शिक्षा’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे काम अधिक जोमाने केले जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर, विभागीय शिक्षण उपसंचालक श्री.संगवे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांचे अभिनंदन करून स्थलांतरित कार्यालयासाठी मोठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *