मुंबई
शिवसेना भाजप युतीत शिवसेना मोठा भावाच्या भूमिकेत असायची मात्र महाविकास आघाडीत पक्षाची अवस्था बिकट झाली असून सेंच्युरीच्या बाता मारणाऱ्या उबाठाला एक एक जागेसाठी संघर्ष करावा लागतोय, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली. महाविकास आघाडीतील गोंधळाचा ट्रेलर जनतेने बुधवारी सायंकाळी पाहिला. जागा वाटपावरुन काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार यांच्यात षडयंत्र सुरु असल्याचे ते म्हणाले. अंधेरी क्लब हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निरुपम पुढे म्हणाले की बाळासाहेब असताना युतीच्या जागा वाटपात शिवसेनेने राज्यात १७१, १६९, १५३ जागा लढवल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १२४ जागा मिळाल्या होत्या, मात्र यंदा उबाठाला १०० जागा मिळणे अवघड झाले अशी टीका निरुपम यांनी केली. मविआमधील जागा वाटपाचा विचार केला ८५ च्या फॉर्म्युला पाहता २५५ जागा होतात. मग उर्वरित जागांबाबत कोणतीही स्पष्टता नाही. उबाठा प्रवक्ता जागा वाटपात सेंच्युरी गाठणार असा दावा करत असतील तर मग काँग्रेसला फक्त ८५ जागांवर अडकवून ठेवणार का, असा प्रश्न निर्माण झाल्याचे निरुपम म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा जो गोंधळ सुरु आहे त्याचा ट्रेलर काल महाराष्ट्राने बघितला. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ८५, ८५, ८५ असे एकूण २७० असे नवीन गणितं त्यांनी महाराष्ट्राला सांगितले, असा टोला निरुपम यांनी लगावला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे आणि उबाठाकडे केवळ १५ आमदार आहेत. काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. शरद पवार गट आणि उबाठाचे मिळून ३० आमदारांपेक्षाही काँग्रेसचे आमदार जास्त आहेत. मात्र तिन्ही पक्षांना समान ८५ जागा देऊन शरद पवार आणि उबाठाने काँग्रेस पक्षाला मूर्ख बनवले, अशी टीका निरुपम यांनी केली. महायुतीचे जागा वाटप चर्चा योग्यप्रकारे सुरु असून अंतिम निर्णय लवकरच होईल, असे निरुपम म्हणाले.
जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि उबाठामध्य १०० तासांहून अधिक तास चर्चा सुरु आहे. एकमेकांवर अरेतुरेची भाषा, एकेरी उल्लेख करत वरिष्ठ नेत्यांचा अवमान झाला. उबाठाच्या आक्रमक भूमिकेपुढे काँग्रेस नेत्यांनी सपशेल शरणागती पत्कारल्याचे दिसून येते. यामुळे राज्यातील काँग्रेसला उबाठाकडून मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निराशा आणि तीव्र नाराजी आहेत. ते पुढे म्हणाले की, लोकसभेतील काँग्रेसचा स्ट्राईक रेट कमी राहावा म्हणून उबाठा प्रयत्न करेल. काँग्रेसमधील १२ नेते मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. ते १२ नेते उबाठा आणि शरद पवार पक्षांचे उमेदवार पाडण्यासाठी काम करतील, अशी टीका निरुपम यांनी केली. सध्या मुख्यमंत्री पदावरुन तिन्ही पक्षांमध्ये जोरदार भांडण सुरु असून निकालानंतर विरोधी पक्ष नेत्याबाबत मविआमध्ये वादावादी होईल, असा दावा निरुपम यांनी केला.