मुंबई :
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती श्री. सी.पी. राधाकृष्णन भूषवणार आहेत. या दीक्षान्त समारंभाला केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय कंरदीकर हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमासाठी अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्यासोबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित राहणार असल्याचे परीक्षा व मूल्यपामन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.
प्रा. अभय करंदीकर हे प्रसिद्ध वैज्ञानिक असून आयआयटी कानपुरचे संचालक म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले आहे. तत्पूर्वी त्यांनी आयआयटी मुंबई येथे अधिष्ठाता (फॅकल्टी अफेअर्स) आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून सेवा प्रदान केली आहे. भारतीय दूरसंचार मानक विकास सोसाइटीच्या स्थापनेमध्ये त्यांचे विशेष योगदान लाभले आहे. भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (ट्राई) चे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. प्रा. अभय करंदीकर यांना संशोधनाचा दीर्घ अनुभव असून त्यांची अनेक पेटंट प्रसिद्ध झाली असून विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त जर्नल्समध्ये लेख आणि पुस्तके प्रसिद्ध आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. प्रा. अभय करंदीकर हे या दीक्षान्त समारंभात दीक्षान्तपर भाषण करणार आहेत.
ज्या स्नातकांनी पदव्यांसाठी आणि पदवीकांसाठी स्वतःची पात्रता सिद्ध केलेली आहे त्यांना पदवी प्रदान करण्यासाठी या दीक्षान्त समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील सुमारे दीड लाखांहून अधिक स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर विविध विद्याशाखेतील स्नातकांना विद्यावाचस्पती (पी.एचडी) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदके बहाल करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलवर करण्यात येणार येईल.