मुंबई :
निधीचा तुटवडा निर्माण झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीत दिवाळी भेट रक्कम मिळाली नाही. सण उचल मिळाली नाही. पी.एफ., ग्रॅच्युटी सारखी देणी थकली असताना एसटीकडून प्रवाशाना दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सवलतीची सरकारकडून मिळणारी रक्कम म्हणजेच सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेतून प्रवाशी कराची, समायोजन या गोंडस नावाखाली वसुली करणे हे निंदनीय असून एसटी व कर्मचारी यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे..
एसटी महामंडळाकडून राज्य सरकार १७.५ टक्के इतका प्रवाशी कर वसूल करीत असून त्यातील १० टक्के इतकी रक्कम राज्य सरकार कडून भांडवली अंशदान म्हणून एसटीकडे गुंतवणूक केली जात आहे. उरलेली साडे सात टक्के इतकी रक्कम सरकारकडून प्रत्यक्ष वसूल केली जात आहे. ही साडे सात टक्के रक्कम सरकार सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम एसटीला देताना त्या रक्कमेतून कपात करून सरकार वसूल करीत आहे. ही रक्कम साधारणतः महिन्याला सुमारे ३५ कोटी रुपये इतकी होत असून त्यातील ८२ कोटी ३४ लाख रुपये इतकी रक्कम कालच समायोजन या गोंडस नावाखाली राज्य सरकारने वसूल केली आहे. ही रक्कम कधी वसूल करावी याचे राज्य सरकारला भान राहिलेले नाही. कारण ही वसुली करतांना एसटीला खर्चाला कमी पडणाऱ्या पैशाचा विचार केलेला नाही. पी.एफ., ग्रॅच्युटी, बँका, ग्राहक सोसायटी, क्रेडिट सोसायटी, एसटी सामान पुरविणाऱ्या कंपन्या यांच्या साधारण ४००० कोटी रुपयांच्या रक्कमा एसटीकडून थकल्या असताना एसटीला पैशाची गरज असताना अशा वेळी प्रवाशी कर रक्कम वसूल करणे हे नादानपणाचे लक्षण असून ही वसुली करणाऱ्या नादान अधिकाऱ्यांना निवडणुकीनंतर जाब विचारला जाईल असेही बरगे यांनी म्हटले आहे.