मुंबई :
सागर विद्यापीठ भोपाळ मध्यप्रदेश येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ पुरुष बॅडमिंटन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने दर्जेदार कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाचा पुरुष बॅडमिंटन संघ अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्र ठरला असून ही चमू मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय विद्यापीठे संघाच्या वतीने सागर विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाने उपविजेतेपद मिळवत अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. या संघात अभ्युदय चौधरी, इयान लोपीस, क्रिश देसाई, झाकुओ सेयी,अथर्व जोशी, सारांश गजबिये आणि सिद्धार्थ दास विद्यार्थ्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
पुरुष बॅडमिंटन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विरुद्ध ३-२ असा विजय मिळवला, तर देवी अहिल्या विद्यापीठ, इंदूर विरुद्ध ५-० असा विजय मिळवत जेजेटीयू, राजस्थान विरुद्ध अंतिम सामन्यात २-३ ने पराभूत होऊन उपविजेतेपद प्राप्त केले आहे. या स्पर्धेसाठी १०३ विद्यापीठाचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र.कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी या चमूचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले.
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठास सुवर्ण पदक
गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर येथे दिनांक ११ ते १५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो मुलींच्या स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठास सुवर्णपदक मिळाले आहे. ७३ किलो वजन गटात श्रेया जाधव या विद्यार्थींनीने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. भारतीय विद्यापीठे संघाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातील ८० विद्यापीठे सहभागी झाली होती. श्रेया जाधवने चंदीगड विद्यापीठ २-०, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ-नॉकआऊट, गौतम विद्यापीठ २-०, मणीपूर विद्यापीठ- नॉकआऊट, दिल्ली विद्यापीठ २-०, कृषी नन्नया विद्यापीठ, राजमुंद्री, आंध्रप्रदेश २-०, एमजीयु कोट्टायम (उपांत्य फेरी) २-० आणि गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर (अंतिम सामना) नॉकआऊट अशी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदावर नाव कोरले आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या वतीने विविध वजन गटातील ८ खेळाडू सहभागी झाले होते. श्रेया जाधव ने केलेल्या या सुवर्ण कामगिरीमुळे सर्वच स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्रेयाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र.कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले.