मुंबई :
सरस्वती मंदिर हायस्कूलसच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त आंतरशालेय लंगडी व खो-खो स्पर्धांचे आयोजन केले आहे. यानिमित्त शाळेच्या व्यवस्थापनाने आज प्रभात फेरीने सुरवात केली व त्यानंतर क्रीडा क्रीडा मोहत्सवाला सुरवात झाली आहे. यावेळी भूषण मर्दे, संजय सुकटनकर, डॉ. आशिष मुळगावकर, सुधाकर राऊळ, मुख्याध्यापक चाबुकस्वार, उपमुख्याध्यापिका सौ. बिनसाळे इ. संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
माहीम येथील सरस्वती मंदिर हायस्कूलच्या मैदानावर आयोजित आंतरशालेय लंगडी स्पर्धेला आज सुरवात झाली. पहिल्या दिवशी मुलींचे तर दुसऱ्या दिवशी मुलांचे सामने होणार आहेत. आज झालेल्या मुलीच्या स्पर्धेत उपांत्यफेरीतील सामन्यांमध्ये रंगतदार खेळ पाहायला मिळाला. या सामन्यांमधून सरस्वती मंदिर हायस्कूल आणि श्री गणेश विद्यालय यांनी आपापले सामने जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवले.
पहिला उपांत्यफेरी सामना
पहिल्या उपांत्यफेरीत सरस्वती मंदिर हायस्कूलने अहिल्या विद्या मंदिरचा २६-१२ असा १४ गुणांनी पराभव केला. सरस्वती मंदिरच्या गौरी कांबळे (१:४० मि. संरक्षण, ३ गुण), वैदवी बटावले (४.०० मि. नाबाद संरक्षण, ३ गुण), अपूर्वा मुळीक (आक्रमणात १० गुण) यांनी जोरदार कामगिरी करत संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. तर पराभूत अहिल्या विद्या मंदिरच्या नईला शेख (१:२० मि. संरक्षण, २ गुण), ध्रुवी गोलार (१:०० मि. संरक्षण, ४ गुण) यांनी दिलेली लढत अंतिम फेरीसाठी अपुरी ठरली.
दुसरा उपांत्यफेरी सामना
दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात श्री गणेश विद्यालयाने वाडीबंदर मुंबई पब्लिक स्कूलचा २३- २१ असा २ गुणांनी पराभव केला. या सामन्यात श्री गणेश विद्यालयाच्या वेदांगी भुरवने (आक्रमणात ४ गुण), श्रुतिका मोरे (आक्रमणात ४ गुण), मानसी बूनेसर (आक्रमणात ३ गुण) यांनी आपल्या संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. तर पराभूत वाडीबंदर मुंबई पब्लिक स्कूलच्या अंकिता वाकोडे (१:०० मि. संरक्षण व ३ गुण), खुशी थोरले (आक्रमणात ४ गुण) यांनी चमकदार खेळ केला, पण विजयासाठी केलेला खेळ पुरेसा ठरला नाही.
अंतिम सामन्याची उत्सुकता
उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात सरस्वती मंदिर हायस्कूल आणि श्री गणेश विद्यालय यांच्यात अटीतटीची झुंज पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे. दोन्ही संघातील खेळाडूंची आक्रमकता आणि बचाव कौशल्य स्पर्धेला वेगळेच परिमाण देईल.