मुंबई :
सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये ‘श्री गणेशा’ या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मराठीतील आगळा वेगळा रोड मूव्ही असलेल्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सुरुवातीलाच लक्ष वेधल्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टिझरने उत्सुकता वाढवली. आता या चित्रपटातील नवे कोरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. फॅमिली एन्टरटेनर रोड मूव्ही असलेल्या ‘श्री गणेशा’मधील ‘आली मधुबाला…’ हे गाणे संगीतप्रेमींचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सादर करण्यात आले आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत असल्याने अल्पावधीतच या गाण्याने हजारो व्ह्यूज मिळवले आहेत. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रस्तुत केलेल्या ‘श्री गणेशा’ चित्रपटाची निर्मिती संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले यांनी केली आहे. आजवर नेहमीच संगीतप्रधान मनोरंजक चित्रपट बनवणाऱ्या मिलिंद कवडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘श्री गणेशा’च्या रूपात प्रेक्षकांना जणू लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाकाच पाहायला मिळणार आहे. यातील ‘आली मधुबाला…’ हे गाणे धमाल करणारे आहे. नानुभाई जयसिंघानी यांच्या व्हिडीओ पॅलेसची प्रस्तुती असलेले हे गाणे अभिनेत्री मानसी शिंदेवर चित्रीत करण्यात आले आहे. गीतकार जय अत्रेने लिहिलेले हे गाणे पार्श्वगायिका कविता राम यांच्या आवाजात संगीतकार वरुण लिखते यांनी संगीतबद्ध केले आहे. ‘आली मधुबाला…’ हे ढाब्यावरील गाणे आहे. प्रथमेश परब, शशांक शेंडे आणि मेघा शिंदे यांनी चित्रपटात साकारलेल्या तीन मुख्य व्यक्तिरेखा ढाब्यावर जेवण्यासाठी जातात, तेव्हा ‘आली मधुबाला…’ हे गाणे सुरू होते. ‘वाढलंया ताट आता पटकीनी बसा…’ असे या गाण्याचे सुरुवातीचे बोल आहेत. या गाण्यात निळ्या रंगाची नऊवारी परिधान केलेल्या मानसीने मराठमोळ्या शैलीत अफलातून डान्स केला आहे. तिच्यासोबत डान्स करणाऱ्या सहनर्तकांनीही केलेली मराठमोळी वेशभूषा लक्ष वेधून घेते. राहुल ठोंबरे यांचे नृत्य दिग्दर्शन आणि कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या कल्पक कला दिग्दर्शनाचे दर्शन या गाण्यात घडते. थोडक्यात काय तर ‘आली मधुबाला…’ हे एक धमाल गाणे असून, सध्या लगीनसराई सुरू असल्याने लग्नसोहळे आणि वरातींमध्ये वऱ्हाडी मंडळींना ताल धरायला लावणारे आहे.
या धमाकेदार गाण्याबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, ‘आली मधुबाला…’ हे गाणे चित्रपटात एका महत्त्वाच्या प्रसंगी येते. या चित्रपटाच्या रूपात मराठी प्रेक्षकांसाठी एक धमाल फॅमिली एन्टरटेनर रोड मूव्ही घेऊन आलो आहोत. आमच्या यापूर्वीच्या कलाकृतींना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आता ‘श्री गणेशा’ हा चित्रपटही ते डोक्यावर घेतील असा विश्वासही मिलिंद यांनी व्यक्त केला आहे.
‘श्री गणेशा’ची कथा मिलिंद कवडे यांची असून, पटकथा संजय नवगिरे यांच्या साथीने लिहिली आहे. संवाद लेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डीओपी हजरत शेख वली सिनेमॅटोग्राफी यांनी केली आहे. गीतकार जय अत्रेसोबत मंदार चोळकर यांनीही या चित्रपटासाठी गीतलेखन केले आहे. सर्व गाणी संगीतकार वरुण लिखते यांनी संगीतबद्ध केली आहेत. अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिले असून, गुरु पाटील यांनी संकलन केले आहे. राहुल ठोंबरे यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून, सुमित पाटील यांनी कला दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते दिपक एस कुदळे (पाटील), तर सहदिग्दर्शक विनोद शिंदे आहेत.