क्रीडा

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा – महाराष्ट्राची मुले उपांत्य, मुली उपांत्यपूर्व फेरीत दाखल

अलिगड :

कुमार व मुलींच्या 43व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी उपांत्य तर मुलींनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस्‌‍ स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांनी कोल्हापूर आणि पश्चिमबंगालवर मात करीत उपांत्य फेरी गाठली. आशिष गौतम (1.40 मिनिटे व 6 गुण) व पार्थ देवकते (2.00 मि.व 6 गुण) यांच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांनी पश्चिम बंगालला 32-28 असे 9 गुणांनी नमविले. त्याअगोदर महाराष्ट्राने कोल्हापूरवर 41-26 अशी 15 गुणाने मात केली. यातही पार्थने अष्टपैलू खेळी केली. त्याने 1.40 मिनिटे संरक्षण करीत आपल्या धारदार आक्रमणात 10 गडी टिपले. सोत्या वळवी (1.10 मि. 8 गुण) व कृष्णा बनसोडे (2.00 मि. व 2 गुण) यांनीही अष्टपैलू खेळी करीत त्याला साथ दिली. कोल्हापूरकडून सुभम माकोटे याने (1.10 मि. नाबाद व 8 गुण) व श्रेयस पाटीलने (1.20 मि, 6 गुण) यांनी लढत दिली.

मुलींच्या सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगडचा 30-14 असा एक डाव राखून 16 गुणांनी धुव्वा उडविला. संघाच्या विजयात प्रतीक्षा बिराजदार (4.00 मि. व 2 गुण), स्नेहा लामकाने (2.30 मि. नाबाद व 2 गुण), सुषमा चौधरी (2.30 मि. व 2 गुण) व सुहानी धोत्रे (1.30 मि. व 6 गुण) यांच्या अष्टपैलू खेळांचा समावेश आहे. छत्तीसगडकडून जमीता शाहू (1.20 मि. नाबाद व 2 गुण) हिची एकाकी लढत अपुरी पडली.

कोल्हापूरच्या मुली उपांत्यपूर्व फेरीत

कोल्हापूरच्या मुलींनी विदर्भवर मात करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्यांची लढत कर्नाटकाबरोबर पडले. महाराष्ट्राच्या मुलांची उपांत्य फेरीत आंध्र व दिल्ली यांच्यातील विजेत्या संघाबरोबर पडेल. मुली राजस्थबरोबर लढतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *