मुंबई :
विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्यामध्ये सुधारणा व्हावी, त्यांचे आकलन, विविध कौशल्यांचे विकसन इत्यादींचे मूल्यमापन व्हावे, तसेच अधिक प्रभावी अध्यापन पद्धती विकसित करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने (आयआयटी मुंबई) ‘तारा’ (टीचर्स असिस्टंट फॉर रीडिंग असेसमेंट) म्हणजेच ‘शिक्षकाचा वाचन मूल्यमापन सहाय्यक’ या नावाने ॲप विकसित केले आहे. सध्या हे ॲप इंग्रजी व हिंदी या भाषांमध्ये असून, केंद्रीय विद्यालयांमध्ये या ॲपचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे.
शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकडे शिक्षण प्रणालीचा जोर असला तरी ‘असर’च्या सर्वेक्षणानुसार पाचव्या इयत्तेतील अर्ध्याहून अधिक विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करता येत नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधूनही भारतातील किमान ५ कोटी विद्यार्थ्यांना अद्याप पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान येत नाही. करोनामुळे ही परिस्थिती अधिकच खालावली. त्यामुळे साक्षरता मूल्यमापन प्रक्रियेला अधिक वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आयआयटी मुंबईच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्रा. प्रीती राव यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी विशेष मोबाईल ॲप विकसित केले आहे. ‘तारा’ (टीचर्स असिस्टंट फॉर रीडिंग असेसमेंट) म्हणजेच ‘शिक्षकाचा वाचन मूल्यमापन सहाय्यक’ असे या ॲपचे नाव आहे.
‘तारा’ ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची भाषा बोलण्याची प्रक्रिया व अध्ययन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वयंचलित पद्धतीने वाचनातील ओघवतेपणा मोजता येतो. हे ॲप वाचनातील ओघवतेपणा तपासण्यासाठी विद्यार्थ्याने केलेल्या पातळीनिहाय वाचनाच्या रेकॉर्डिंगमधील गुणांकन मार्गदर्शिका तपासते. यासाठी नेहमी वापरला जाणारा ‘अचूक शब्द प्रति मिनिट’ हा निकषही समाविष्ट केला आहे. वाचन नमुन्यामध्ये वाक्य कोठे तोडले जात आहे, तसेच आवाजातील चढ-उतार, शब्दांवर दिला जाणारा जोर यांसारखी वैशिष्ट्ये ‘तारा’ ॲप तपासते. यामुळे वाचन कौशल्याची अचूक पातळी ठरवण्यासाठी सर्वसमावेशक पद्धतीने गुणांकन होते. विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्यामध्ये सातत्याने सुधारणा व्हावी म्हणून अधिक प्रभावी अध्यापन पद्धती विकसित करण्यासाठी ‘तारा’ची टीम केंद्रीय विद्यालयांसोबत काम करत आहे. ‘तारा’ ॲपच्या माध्यमातून नुकतेच ऑक्टोबरमध्ये विद्यार्थ्यांच्या प्राथमिक चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये हिंदी व इंग्रजी भाषांमधील वाचन कौशल्याच्या मापदंडांविषयीची महत्वाची माहिती संकलित केली. या सुधार कार्याचा प्रभावीपणा मूल्यमापनाच्या पुढील फेरीमध्ये निदर्शनास येईल व त्याचा सर्वंकष परिणाम वर्षभर ठराविक कालावधीने घेतल्या जाणाऱ्या सराव चाचणी फेऱ्यांद्वारे पाहायला मिळेल, असे प्रा. राव यांनी सांगितले.
कौशल्य संपादनासंदर्भात प्रत्यक्ष डेटा उपलब्ध करणाऱ्या डिजिटल साधनाची गरज दीर्घकाळापासून होती. ही पोकळी ‘तारा’ ॲपने भरून काढली आहे. ही एक परिपूर्ण प्रणाली असून त्यामध्ये सहजतेने ध्वनिमुद्रण करता येते. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या व त्याचबरोबर वर्ग, शाळा किंवा प्रदेशासारख्या गटाच्या कौशल्यपातळीविषयी माहिती मिळत असल्याचे टाटा ट्रस्ट येथील मूलभूत भाषा विकास व साक्षरता प्राविण्य केंद्राचे प्रमुख आणि वाचन अध्यापनशास्त्र तज्ज्ञ डॉ. शैलजा मेनन यांनी सांगितले.
केंद्रीय विद्यालयांमध्ये ‘तारा’ ॲपचा वापर
देशातील केंद्रीय विद्यालयांच्या शाळांमध्ये ‘तारा’ ॲप वापरण्यास सुरुवात केली आहे. इयत्ता ३ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी व हिंदी भाषेच्या तोंडी वाचन कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी हे ॲप वापरले जात आहे. या उपक्रमाध्ये देशातील सुमारे १२०० शाळांमधील ७ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. देशातील या प्रकारचा हा सर्वात व्यापक उपक्रम ठरला आहे.
तज्ज्ञांनी तपासलेल्या मुलांच्या वाचन नमुन्यांवरून ही प्रणाली तयार केली गेली आहे. सध्या हे ॲप इंग्रजी व हिंदी भाषांसाठी उपलब्ध आहे. ॲपच्या मूल्यमापनाची विश्वासार्हता मानवी तज्ञांद्वारे केलेल्या मूल्यमापनाच्या विश्वासार्हता पातळीशी जुळवून घेण्यात आली आहे.
– प्रा. प्रीती राव, विद्युत अभियांत्रिकी विभाग, आयआयटी मुंबई