मुंबई :
मुंबई विद्यापीठाचा २०२४ चा दीक्षान्त समारंभ दि. ७ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. यासाठी प्रथम सत्र २०२४ मध्ये विद्यापीठाने घेतलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर मराठी (देवनागरी ) नाव अचूक यावे तसेच पदवी प्रमाणपत्रावरील मराठी (देवनागरी) नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी विद्यापीठामार्फत पदवी प्रमाणपत्रांचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जात आहे.
पदवी प्रमाणपत्रावरील मराठी (देवनागरी ) नाव अचूक असावे तसेच त्यात काही दुरुस्ती असल्यास अशा सर्व दुरुस्त्या करण्यासाठी व पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचा पदवी प्रमाणपत्राचा तपशील मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर दि. ७ डिसेंबर २०२४ पासून ते १७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तपासणी आणि दुरुस्तीसाठी उपलब्ध करून दिला जात आहे. सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी दिलेल्या मुदतीत मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन पदवी प्रमाणपत्रावरील मराठीतील (देवनागरी ) नावाचा तपशील अचूक असल्याची खात्री करावी तसेच दुरुस्ती असल्यास आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी केले आहे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयांना वरील लिंकवरून पदवी प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध होऊ शकणार नाही किंवा त्यांना महाविद्यालयाचे नाव, विद्यार्थ्यांचे नाव, श्रेणी इत्यादींबाबत काही शंका असल्यास त्यांनी १७ डिसेंबर २०२४ पूर्वी muconvo2024@mu.ac.in या ईमेल आयडीवर ईमेल पाठवण्याचे आवाहनही त्यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळावर दि. ७ डिसेंबर २०२४ पासून लिंक कार्यान्वित केली जाणार असून सर्व संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.