मुंबई :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई शहर जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशी, विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या एफ विभागाचे निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ते दि. ६ डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत, असे आदेश मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहे. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या आदेशानुसार, राज्य उत्पादन शुल्कचे डी विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील एन.एम जोशी मार्ग व वरळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी सर्व अबकारी अनुज्ञप्त्या, ई विभाग निरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील भोईवाडा व माटुंगा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व अबकारी अनुज्ञप्त्या ६ डिसेंबर २०२४ रोजी संपूर्ण दिवसभर बंद राहतील. संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावणी करण्यात कुचराई करतील त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या आदेशात नमूद आहे.
चैत्यभूमीवरील सुविधांची कोकण विभागीय आयुक्तांकडून पाहणी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करतात. त्यांच्यासाठी प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा चैत्यभूमी आणि परिसरात केल्या जातात. कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी या सुविधांची पाहणी करून आढावा घेतला. विभागीय आयुक्त देशमुख म्हणाले की, चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येत असून अनुयायांसाठी वैद्यकीय कक्षही उभारण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) आणि परिसरात पुरविण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधांबाबत सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करीत समन्वय साधून कार्यवाही करावी. तसेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा अनुयायांना मिळतात की नाही याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी कोकण विभागीय अतिरिक्त आयुक्त विवेक गायकवाड, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण तेजाळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच चैत्यभूमी येथे दाखल झालेल्या अनुयायांना खाद्य पदार्थांच्या किटचे वाटप करण्यात आले.