ठाणे :
ठाणे फ्रेंड्स यूनियन क्रिकेट क्लबतर्फे माजी रणजीपटू तुकाराम सुर्वे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ खेळवण्यात येणाऱ्या १६ वर्षे वयोगटातील चार संघांच्या पहिल्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड चाचणी रविवारी सेंट्रल मैदानावर पार पडली. ही स्पर्धा १७ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान रंगणार असून स्पर्धेतील सामने सेंट्रल मैदान आणि दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खेळले जातील असे स्पर्धेचे प्रमुख संयोजक अतुल सुर्वे यांनी सांगितले.
स्पर्धेबाबत अतुल सुर्वे म्हणाले बाबा या टोपणनावाने मुंबई ठाण्यातील क्रिकेट वर्तुळात परिचित असणाऱ्या तुकाराम सुर्वे यांनी स्थानिक क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धा खेळवताना ज्युनिअर गटातील स्थानिक क्रिकेटपटूंना वरच्या पातळीवर खेळण्याची संधी कशी मिळेल याचा विचार केला. स्पर्धेचे सहसंयोजक अनिश सुर्वे म्हणाले या स्पर्धेकरता तुकाराम सुर्वे यांचे समकालीन अनंत धामणे, गोविंद पाटील, सदाभाऊ सातघरे आणि गणाभाऊ भुवड यांच्या नावाने चार संघ असतील. सर्वश्री परेश नाखवा, किरण साळगावकर, दर्शन भोईर आणि संग्राम शिर्के या संघाचे प्रशिक्षक असतील. चार संघाच्या प्रत्येकी सोळा खेळाडूंच्या निवड चाचणीत १६ वर्षे वयोगटाचे जिल्ह्यातील सुमारे चारशे युवा क्रिकेटपटू सहभागी झाले होते. मुंबई क्रिकेट संघटनेच्या १६ वयोगटाच्या संघाचे निवड समिती सदस्य प्रशांत सावंत, जयप्रकाश जाधव, मुंबईच्या वरिष्ठ संघाच्या निवड समितीतील माजी रणजीपटू रवी ठक्कर, राजू शिर्के यांनी खेळाडूंची निवड केली. स्पर्धेतील सामने साखळी पद्धतीने खेळले जाणार असून गुणानुक्रमे अव्वल असणारे दोन संघ थेट अंतिम फेरीत खेळतील. या निवडचाचणी दरम्यान मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अभय हडप, सहसचिव दिपक पाटील, कौशिक गोडबोले, स्पर्धा समितीचे विघ्नेश कदम उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अंजिक्य नाईक यांच्या हस्ते होणार आहे.