मुंबई :
आमदार मंगल प्रभात लोढा यांनी आज दादर पूर्व, मध्य रेल्वे प्लॅटफॉर्म क्र. १२ येथील स्टेशनला लागून असलेल्या हनुमान मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर विश्वस्थांशी संवाद साधला आणि आरती केली. प्रसंगी आमदार कालिदास कोळंबकर, बजरंग दल आणि विश्वहिंदू परिषद चे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. या मंदिराचे निष्कासन होणार नसून याबाबत आपण स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याशी बोललो आहोत. या निर्णयाला थांबवण्याची ऑर्डर देखील माझ्याकडे आहे असे यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
मंगल प्रभात लोढा यांनी आमदार आशिष शेलार यांच्या समवेत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली. त्यानुसार, कारवाई स्थगित करण्यात आली आहे. प्रसंगी उपस्थित पत्रकारांशी बोलतांना लोढा म्हणाले “केंद्र आणि महाराष्ट्रात हिंदुत्वाचे आणि लोकांचे ऐकणारे सरकार आहे. हिंदू समुदायाची या मंदिराबाबतची भावना आम्ही जाणतो त्यामुळे या पवित्र स्थानाला कोणताही धक्का लागणार नाही असे आश्वासन मी देतो. या मंदिराबाबत समजल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते, बजरंग दलाचे आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आम्ही सर्वच केंद्रीय रेल्व मंत्री अश्विन वैष्णव यांच्या संपर्कात होतो. मंदिराचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले या पुढे सुद्धा नेहमिच करु. धार्मिक आस्थेच्या विषयाचे राजकारण करण्याचा काहींचा मानस सफल होण्याआधीच आम्ही मंदिर वाचवण्यात यशस्वी झालो.”
मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या सहायक विभागीय अभियंत्यांनी दादर येथील मध्य रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १२ च्या पूर्वेकडील आरपीएफ ऑफिसच्या मागे असलेल्या अनधिकृत मंदिराला ७ दिवसांची नोटीस कार्यालयीन पत्र क्रमांक BB/W/ADEN/BY/Encroachment/notice दिनांक ०४.१२.२०२४ अन्वये दिली होती. मात्र, सदर नोटीसच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.