मुंबई :
७ ते ११ डिसेंबर २०२४ दरम्यान वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ कोटा राजस्थान येथे झालेल्या पश्चिम विभागीय महिला फुटबॉल स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने दर्जेदार कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाचा महिला फुटबॉल संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरला असून ही चमू मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महिला फुटबॉल स्पर्धेत मुंबई विद्यापीठ महिला फुटबॉल संघाने एम. एल. एस विद्यापीठ उदयपुर यांना ६-० ने हरवून अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध केली आहे. या स्पर्धेत ४५ विद्यापीठाचे संघ सहभागी झाले होते.
मुंबई विद्यापीठाच्या या संघामध्ये फ्लोरिण परेरा, प्रणाली भोसले, शिखा राणी भकत, ग्लिनेल पिकार्डो, रिद्धी मेहरा, बुशरा शेख, रियान डिकोना, पूजा राजपूत, टिया परेरा, समीक्षा अहिरेकर, पारुल कासवान, नमिक्षा शेट्टी, कोमल मसुरकर, भौमी नारकर, निती लाधा, इसाबेल गॅब्रिएल डिसूझा, किआरा पिंटो, एंजेलिना सिक्वेरा, लाएल रेगो या खेळाडूंचा सहभाग होता. संघाला प्रशिक्षक म्हणून शरविन चांग आणि संघ व्यवस्थापक म्हणून लॉरेन्स नादर यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी या चमूचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले.