मुंबई :
नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा ‘नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५’ ची घोषणा करण्यात आली. यंदा मानकऱ्यांमध्ये लोककला अभ्यासक गणेश चंदनशिवे, आरोग्य क्षेत्रासाठी जी. टी. रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक विजय गायकवाड, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. महेश अभ्यंकर यांचा समावेश आहे.
आरोग्य क्षेत्रासाठी निवड करण्यात आलेले जी. टी. रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक विजय गायकवाड हे २० वर्षांपासून समाजसेवा विभागात कार्यरत आहेत. काउन्सिल आफ इंटरनॅशनल फेलोशिप, इंडियातर्फे शैक्षणिक प्रयोजनासाठी Australia आणि Sweden या देशांमध्ये अभ्यास दौरा निवड, महाराष्ट्र राज्य समाज सेवा अधिक्षक संघटनेचे अध्यक्ष तसेच सचिव सी.एस.आर सेल , वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय महाराष्ट्र राज्य अशा उल्लेखनीय पदावर कार्यरत आहेत. कोरोना काळामध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. यामध्ये त्यांनी मार्च ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत दररोज देणगी माध्यमातून १०० कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या व नाष्ट्याची सोय केली. रुग्णलयातील कोरोना योद्ध्यांसाठी एक महिन्यांचे रेशन देणगीदारांच्या मदतीने उपलब्ध करून दिले. पीपीई किट, एन ९५ मास्क, डिस्पोजल बेटशीट, एक्स रे, व्हेंटिलेटर मशीन, अत्याधुनिक फिजोथेरपी सेंटर, कोरोना रूग्णासाठी विशेष शस्त्रक्रिया सेंटर विविध देणगीदार व स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने जी.टी. रुग्णालयाला उपलब्ध करून दिले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत विविध वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालये यांना सीएसआरच्या माध्यमातून रुग्णोपयोगी साहित्य, शैक्षणिक पुस्तके, शालेय विद्यार्थ्यांना मोफत चश्मे उपलब्ध करून दिले. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे रूग्णांना ब्लँकेट, शुद्ध पिण्याचे पाणी, १५० रुग्णांना माेफत जयपूर फूट, कृत्रिम हात, कॅलिपर्स उपलब्ध करून दिले. तसेच गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील करोना योद्ध्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी १३ ते १६ वयोगटातील मुलांना गुगल नेस्ट मिनी डिवाईस व शैक्षणिक टॅब उपलब्ध करून दिले. यामुळे कर्मचाऱ्यांच्या या मुलांना शिक्षणामध्ये चांगलीच मदत झाली आहे.
सामाजिक क्षेत्रासाठी गडचिरोलीच्या कुसुम आलम, यवतमाळच्या प्रतिष्ठा काळे आणि मुंबईतून रवींद्र देडिये, गणेश हिरवे आणि धनंजय पवार यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रासाठी मुंबईतील हर्षदा घोले, प्रतीक्षा शेलार आणि ऋतुजा देवकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रशासकीय क्षेत्रासाठी नागपूरमधील के. आर. बजाज आणि रमेश होतवानी, पत्रकार क्षेत्रासाठी अशोक जसवानी (बुलढाणा), शैक्षणिक क्षेत्रासाठी महेश सोनवले (मुंबई), उद्योग क्षेत्रासाठी सुषमा कुर्ले (मुंबई) आदी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
राज्यातील विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या मान्यवरांना ‘नवक्षितिज महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे, सचिव धर्मराज तोकला यांनी दिली. पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत १९ जानेवारी २०२५ रोजी भानुबेन कलाघर नंदादीप हायस्कूल, गोरेगाव पूर्व येथे होणार आहे.