मुंबई :
कल्याण येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे अमरजीत मिश्रा यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकरणी ३० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले असून आरोपीला चार महिन्याच्या आत कठोर शिक्षा करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.
मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा आणि कल्याण पूर्वच्या भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी शनिवारी कल्याण पिडितेच्या माता पित्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी वरील आश्वासन दिले. यावेळी पिडितेच्या कुटुंबियांकडून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पिडितेच्या कुटुंबियांना सांत्वना दिली. तसेच तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही असे, आश्वासन दिले. या कुटुंबाला कोणी त्रास देणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना दिले. दोषी आता जेलच्या बाहेर येऊ शकणार नाही त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईलच असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. अमरजीत मिश्रा यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, उज्वल निकम यांची या प्रकरणी खटला लढण्यासाठी नियुक्ती तसेच ३० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाने पिडिता तसेच तिचे कुटुंबियांना तात्काळ न्याय मिळणार असल्याचा विश्वास मिश्रा यावेळी व्यक्त केला.