शिक्षण

मुंबई विद्यापीठात मिळणार केमिकल सायन्सेसमध्ये एकत्रित पदवी

अमेरिकेतल्या प्रतिष्ठित सेंट लुईस विद्यापीठासोबत जॉइंट डिग्री साठी करार

मुंबई : 

मुंबई विद्यापीठ आणि अमेरिकेतील प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात झालेल्या करारानुसार आता मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्याना केमिकल सायन्सेस मध्ये जॉइंट डिग्री ( सह पदवी) चे शिक्षण मिळणार आहे. एमएस डेटा एनालिटिक्स आणि एमएस सायबर सिक्युरिटी या दोन अभ्यासक्रमांच्या सह पदवीला विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता एम.एस. इन केमिकल सायन्सेस मध्ये सह पदवीसाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. नुकतेच मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात युएएस वाणिज्य दुतावास मुंबई येथे शैक्षणिक सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. शिवराम गर्जे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील, नॅनो सायन्स नॅनो टेक्नोलॉजी विभागाचे संचालक डॉ. विश्वनाथ पाटील आणि सेंट लुईस विद्यापीठाकडून सेंट लुईस विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. फ्रेड पेस्टेलो, वरिष्ठ धोरणात्मक सल्लागार सुंदर कुमारसामी, ग्लोबल ग्रॅड इनिशिएटिव्हच्या संचालिका अनुशिका जैन यांच्यासह युएएस वाणिज्य दुतावास येथील मान्यवर उपस्थित होते.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून एम.एस. इन केमिकल सायन्सेस या जॉइंट डिग्री प्रोग्रामचे शिक्षण मुंबई विद्यापीठात उपलब्ध करून दिले जात आहे. या सह पदवी शिक्षणाअंतर्गत दोन्ही विद्यापीठामार्फत एम.एस. इन केमिकल सायन्सेस या सह पदवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण मुंबई विद्यापीठात तर द्वितीय वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण सेंट लुईस विद्यापीठात मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिपही करता येणार आहे. विशेष म्हणजे सह पदवी कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या या सह पदवीमुळे प्रत्येक संस्थेच्या सामर्थ्याचा आणि कौशल्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टता वृध्दीस हातभार लागणार आहे. एम.एस. इन केमिकल सायन्सेस या अभ्यासक्रमासाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय वातावरणात केमिकल सायन्समधील विविध विषयातील अध्ययनाच्या शाखा, संशोधन पद्धती, अद्ययावत प्रयोगशाळा आणि उपकरणांचा अभ्यास करता येईल. त्याचबरोबर या सहयोगाअंतर्गत दोन्ही विद्यापीठातील पायाभूत व अनुषंगिक सुविधा, कौशल्य आणि आधुनिक उपकरणे आणि संसाधनाच्या एकत्रित वापरामुळे अध्ययन व संशोधनातील संभाव्य परिणाम साध्य करता येऊ शकणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. या करारामुळे उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने वाटचाल करताना रसायनशास्त्र शाखेतील उद्योन्मुख क्षेत्रात भारत आणि अमेरिकेतील संशोधनाच्या प्राधान्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील जागतिक समज विस्तृत करण्यास मदत होईल तसेच विद्यार्थ्यांसाठी संधीचे नवे दालनही खुले होणार असल्याचेही प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांस दोन्ही विद्यापीठाची पदवी मिळवण्याची संधी

१) मुंबई विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठाकडून मिळणाऱ्या सह पदवीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीची आंतरराष्ट्रीय ओळख वाढविण्यास मदत

२) विद्यार्थ्यांना भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांतील वैविध्यपूर्ण शैक्षणिक वातावरण, अध्यापन पद्धती आणि संशोधन पद्धतींचा फायदा

३) दोन वेगवेगळ्या देशांमध्ये राहणे आणि अभ्यास करण्यामुळे विद्यार्थ्यांना सांस्कृतिक जागरूकता, अनुकूलता आणि भाषा कौशल्ये विकसित करण्यास मदत

४) सांस्कृतिक आणि भाषा कौशल्ये वृद्धीस मदत

५) दोन्ही संस्थांमधील अत्याधुनिक संशोधन सुविधा आणि प्रयोगशाळांच्या प्रवेशामुळे व्यावहारिक कौशल्ये आणि संशोधन क्षमता वाढीस चालना

विद्यार्थ्यांना सहाय्य 

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय साहचर्य व विद्यार्थी सहाय्य केंद्राच्या वतीने सेंट लुईस विद्यापीठात द्वितीय वर्षाच्या दोन सत्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिजा सुलभीकरण, तज्ज्ञांकडून सपुदेशन, कागदपत्रांचे साक्षांकीकरण, शिष्यवृत्ती सहाय्य, वसतिगृह सहाय्य अशा अनुषंगिक बाबींसाठी सहाय केले जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *