शिक्षण

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धेत एक लाख हजार विद्यार्थी भरणार रंग

मुंबई : 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे दरवर्षी जानेवारी महिन्यातील दुसऱ्या रविवारी महापौर आयोजित माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ चे आयोजन करण्यात येते. यानुसार यंदादेखील महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी आणि उप आयुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर यांच्या मार्गदर्शनानुसार ही बालचित्रकला स्पर्धा रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. मुंबई महानगरात ४८ ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत सुमारे एक लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

यंदा ही स्पर्धा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ४८ ठिकाणी प्रामुख्याने उद्यानांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. एकूण चार गटात ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस आणि सन्मानचिन्ह तसेच पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे द्वितीय (प्रत्येकी २० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तसेच पारितोषिक), तृतीय (१५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तसेच पारितोषिक), याशिवाय प्रत्येक गटातील प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून (प्रत्येकी ५ हजार रुपये आणि पारितोषिक) देण्यात येणार आहे. तसेच विभाग स्तरावर प्रत्येक गटात ५ याप्रमाणे चार गटात २० याप्रमाणे एकूण २५ प्रशासकीय विभागांमध्ये ५०० उत्तम चित्रांना प्रत्येक ५०० रुपयांचे रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे यंदा १६ वे वर्ष असून, यावर्षी देखील ही स्पर्धा एकूण ४ गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत इयत्ता पहिली व दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक १ करिता ३ विषय ठरविण्यात आले आहेत. यामध्ये ‘मी आणि फुलपाखरू’, ‘मी आजीच्या कुशीत’, ‘मी व माझा मित्र / मैत्रिण’ असे ३ विषय आहेत.

तर इयत्ता तिसरी ते पाचवीत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक २ करिता ‘आम्ही पतंग उडवितो’, ‘आम्ही अभ्यास करतो’, ‘आम्ही राणीच्या बागेत’, असे विषय आहेत. इयत्ता सहावी ते आठवीत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ३ करिता ‘आमच्या शाळेची परसबाग’, ‘आम्ही चौपाटीवर वाळूचा किल्ला बनवितो’, ‘आम्ही गणपती मिरवणुकीत नाचतो’, असे विषय आहेत. तर इयत्ता नववी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ४ करिता ३ विषय निश्चित करण्यात केले आहेत. यामध्ये ‘महानगर मुंबई/मेट्रोपॉलिटन सिटी मुंबई’, ‘महिला सशक्तीकरण, जलसंवर्धन’, ‘जलसंवर्धन’,असे विषय आहेत.

सर्व शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (प्र.) (माध्यमिक) सुजाता खरे यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *