मुंबई :
एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीच्या मोकळ्या जागा एव्हढेच अंगवस्त्र तिच्याकडे शिल्लक आहे. मोकळ्या जगांचा विकास करतांना त्यातून एसटी आर्थिक सुदृढ व्हावी, पूर्वीसारखा अनुभव येऊन लालपरीचे वस्त्रहरण होऊ नये याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे केली आहे.
मीरा भाईंदर पूर्वेला एसटीच्या स्वतःच्या मालकीची वीस हजार चौरस मीटर इतकी जागा असून त्यातील बारा हजार चौरस मीटर इतकी जागा कांदळवन असल्याने तिचा विकास करता येत नाही. आठ हजार चौरस मीटर इतकी जागा विकास करण्यासाठी योग्य असून सदर जागा मीरा भाईंदर महानगर पालिकेला विकसित करण्यासाठी देण्याची घोषणा हल्लीच राज्याच्या नवीन परिवहन मंत्र्यांनी केली असून तिथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीतील काही जागा आर.टी.ओ.कार्यालयाला भाड्याने दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा निर्णय वरवर चांगला दिसत असला तरी एसटीच्या पूर्वीच्या जागा विकसित करतांना राजकारण्याच्या हस्तक्षेपामुळे नियमांची पायमल्ली होऊन बऱ्याच ठिकाणी जागा हडप करण्याचा प्रयत्न झाला आहे. काही ठिकाणी अशी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असून वर्षानुवर्षे त्या जागा व भाड्याने दिलेले गाळे एसटीच्या ताब्यात मिळालेले नाहीत. असेही निदर्शनास आले असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.
राज्यभरात एसटीकडे ८१२ मोकळ्या जागा असून त्याचे क्षेत्र १४३३हेक्टर इतके आहे. एवढी जागा दुसऱ्या कुठल्याही सार्वजनिक उपक्रमाकडे नसून आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीकडे एवढाच एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत आहे. हल्लीच एसटीमध्ये भाडे तत्वावरील गाड्या घेण्याच्या निविदेत हस्तक्षेप होऊन त्यात हेरा फेरी झाल्याचे निदर्शनास आल्याने त्याची चौकशी करण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एसटीत सुरू असलेल्या बहुतांशी प्रकल्पात मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांनी किंवा राजकारण्यांनी नियम व अटी विशिष्ट कंत्राटदारांना फायद्याच्या ठरतील अशाच पद्धतीने टाकण्यासाठी दबाव आणला असल्याचे वारंवार सिद्ध होत असून या बाबतीत सुद्धा असे काही घडू शकते. तशीच शंका आहे. त्यामुळे ते होऊ नये यासाठी नव्या परिवहन मंत्र्यांकडून दक्षता घेतली जावी अशी, अपेक्षा सद्या तरी करायला हरकत नाही असेही बरगे यांनी म्हटले आहे.